कुडाळ विकास आराखड्यात खाजगी जमिनींवरच आरक्षण; शासकीय मालमत्ता वगळल्या - राकेश कांदे
कुडाळ
कुडाळ शहराच्या प्रारूप विकास आराखड्यावर हरकती व सूचना मांडण्याची अंतिम तारीख 8 जुलै होती. या आराखड्यात शासकीय व नगरपंचायतीच्या मालकीच्या जमिनी वगळून खाजगी जमिनींवर मोठ्या प्रमाणात आरक्षणे लादण्यात आल्याचा आरोप माजी नगरसेवक राकेश कांदे यांनी केला आहे. कांदे यांनी दिलेल्या लेखी हरकतीत म्हटले आहे की, आराखड्यात रस्ता आरक्षण, ग्रीन झोनसह विविध आरक्षणे प्रामुख्याने खाजगी मालमत्तांवर टाकण्यात आली आहेत. अनेकांची पूर्वपार घरे, दुकाने आणि बिनशेती परवानगीने बांधलेली संकुले यामुळे बाधित होणार आहेत. कुडाळच्या विकासाला आमचा विरोध नाही, मात्र नागरिक उध्वस्त न होता विकास व्हावा अशी भूमिका आहे.
अवाजवी रुंदीच्या रस्त्यांना सर्वाधिक विरोध
आराखड्यात दाखवलेल्या रस्त्यांच्या रुंदीवर सर्वाधिक हरकती आहेत. त्यात अभिमन्यू हॉटेल ते गांधी चौक-एसटी डेपो, डॉ. आंबेडकर पुतळा ते रेल्वे स्टेशन फाटा, ग्रामीण रुग्णालय ते नाबरवाडी, पोलीस स्टेशन ते सिटी सेंटर, रेल्वे रूळ समांतर एमआयडीसी रस्ता, कुडाळेश्वर मंदिर ते हिंदू कॉलनी, रेल्वे फाटा ते बाव, गुलमोहर ते भैरववाडी, संगिर्डेवाडी, इंद्रप्रस्थ-कुंभारवाडी आदी रस्त्यांचा समावेश आहे. हे रस्ते मध्यबिंदूपासून न दाखवता एकतर्फी दाखवले आहेत.हॉटेल गजालीजवळील एस.एन.देसाई चौक येथील 15 मीटरचा अस्तित्वातील रस्ता वर्दळीसाठी पुरेसा आहे, असेही त्यांनी नमूद केले. भैरव मंदिर हे शहराचे श्रद्धास्थान असून अवाजवी रस्त्यांमुळे ते बाधित होणार आहे.
शासकीय जमिनी जाणून-बुजून वगळल्या?
नगरपंचायतीच्या मालकीच्या अनेक मालमत्ता सातबारा नोंदीसह अस्तित्वात आहेत, मात्र त्या आराखड्यात दाखवल्या नाहीत. हिंदू कॉलनी येथील नळपाणी योजनेची टाकी दाखवली असली तरी आजूबाजूची 20 गुंठ्यांपेक्षा अधिक जमीन वगळली आहे. या जमिनीसाठी ग्रामपंचायत काळापासून केसेसवर लाखो रुपये खर्च झाले आहेत. पोलीस स्टेशनजवळील छत्रपती संभाजी महाराज चौकातील त्रिकोणी शासकीय भूखंडावर स्मारक उभारता येऊ शकते, मात्र तोही आराखड्यात समाविष्ट नाही.
विकासासाठी पर्यायी सूचना
1. पर्यटन निवास: कुडाळ हे जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण असल्याने नगरपंचायतीमार्फत एमटीडीसी धर्तीवर रेस्ट हाऊस प्रकल्प उभारावा.
2. जलतरण तलाव: सावंतवाडी, वेंगुर्लेप्रमाणे कुडाळसाठी जलतरण केंद्राची जागा आरक्षित करावी.
3. कर्मचारी निवास: मच्छी मार्केट परिसरातील शासकीय जमिनीवर सफाई कर्मचाऱ्यांसाठी निवासी प्रकल्प करावा.
4. नदीकिनारी रस्ता: भंगसाळ नदीकिनारी गणेश घाट ते महापुरुष मंदिर हायवे पूलपर्यंत 9 मीटरचा बंधारा रस्ता करावा. यामुळे पर्यटन, बोटिंगसह स्थानिकांना रोजगार मिळेल. हा रस्ता पुढे सांगिर्डेवाडी एसटीपी प्लांटपर्यंत जोडल्यास रिंग रोड होऊन परिसराचा विकास होईल.
कांदे म्हणाले, "लोकांचा विकासाला विरोध नाही. परंतु गरज नसताना अवाजवी रुंदीचे रस्ते लादले तर नक्कीच विरोध होईल. कमी रुंदीचे रस्ते केल्यास नागरिक हा आराखडा हसतमुखाने स्वीकारतील." या विषयात आमदार निलेश राणे यांचे लक्ष वेधणार असल्याचेही त्यांनी सांगितले.कुडाळ नगरपंचायतीच्या विशेष सभेत नगराध्यक्षांसह सर्व नगरसेवकांनीही याबाबत सकारात्मक भूमिका घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
konkansamwad 
