श्री देवी सातेरी जलमंदिराचा वार्षिक जत्रोत्सव 'या' दिवशी साजरा होणार
मसुरे
निसर्गाच्या कुशीत विसावलेल्या आणि कोकणच्या समृद्ध धार्मिक, सांस्कृतिक परंपरेचा वारसा जपणाऱ्या मालवण तालुक्यातील मसुरे गावची मूळमाया" अशी ओळख असलेल्या बिळवस येथील श्री देवी सातेरी जलमंदिरचा वार्षिक जत्रोत्सव २६ जुलै रोजी साजरा होत आहे. कोकणात मान्सूनचे रौद्र आणि देखणे रुप पाहायला मिळत असतानाच हा जत्रोत्सव येतो. मंदिराच्या चहूबाजूंनी पाणी, हिरवीगार सृष्टी आणि त्यातच जलमंदिरात विराजमान झालेली सातेरी देवी हे दृश्यच मनाला एक अलौकिक शांतता देऊन जाते. पावसाळ्यात होणारा हा एकमेव जत्रोत्सव असल्यामुळे मुंबईकर चाकरमानी, गोव्यासह इतर राज्यांतील देवीचे भक्त माऊली चरणी लीन होण्यासाठी बिळवसमध्ये दाखल होतात. २६ जुलैला पहाटेपासूनच जलमंदिराच्या परिसरात भक्तीचे वातावरण निर्माण होणार आहे. जत्रोत्सवाच्या दिवशी सकाळी पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि मंत्रोच्चारात देवीचे विधीवत अभिषेक व पूजन केले जाईल. नंतर भाविकांसाठी दर्शन खुले होईल. सुवासिनींकडून देवीची खणानारळाने ओटी भरणे, तसेच वर्षभरातील नवस फेडण्याच्या धार्मिक विधींना प्रारंभ होईल. दिवसभर चालणाऱ्या या भक्तिमय सोहळ्याची सांगता सायंकाळी पारंपरिक धार्मिक विधींनी होईल. या पवित्र आषाढोत्सवात उपस्थित राहून सातेरी देवीचे दर्शन, ओटी भरणे व नवस फेडणे आदी धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री सातेरी देवालय ट्रस्ट आणि बिळवस ग्रामस्थांनी केले आहे.
konkansamwad 
