मळेवाड-हेदुलवाडीत रिक्षा आणि बोलेरो पिकअपमध्ये अपघात; रिक्षाचालक गंभीर जखमी
मळेवाड दि. २५
मळेवाड हेदुलवाडी येथे बँक ऑफ इंडिया शाखेसमोर शनिवारी दुपारी २.१५ वाजण्याच्या सुमारास रिक्षा आणि बोलेरो पिकअप यांच्यात समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात घडला.या अपघातात रिक्षाचालक विनायक रंगनाथ बाळे (वय ४०, रा. आजगाव भोमवाडा) हे गंभीर जखमी झाले, तर बोलेरो पिकअपमधील चालक आणि एक प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, विनायक बाळे हे रेल्वे स्टेशनवरून मळेवाडच्या दिशेने जात असताना बँक ऑफ इंडिया शाखेसमोर मळेवाडहून सावंतवाडीकडे जाणाऱ्या बोलेरो पिकअपशी त्यांच्या रिक्षाची जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की रिक्षा रस्त्यावरच पलटी झाली आणि रिक्षेचे मोठे नुकसान झाले.अपघाताचा आवाज ऐकताच स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत केली. गंभीर जखमी बाळे यांना तात्काळ सावंतवाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर बोलेरोमधील जखमींना मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी हलवण्यात आले.घटनेची माहिती मिळताच आरोंदा पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला असून अधिक तपास सुरू आहे.
konkansamwad 
