कणकवली दुचाकी चोरीचा छडा
कणकवली
पोलीस ठाण्यात कलम ३०३ (२) अन्वये दाखल असलेल्या मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांचा समांतर तपास करत असताना, सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला (एलसीबी) मोठे यश आले आहे. एलसीबीच्या पथकाने कोल्हापूर येथे सापळा रचून दोन सराईत आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून चोरीच्या दोन्ही मोटारसायकल जप्त करण्यात आल्या आहेत.कणकवली परिसरामध्ये मोटारसायकल चोरीच्या घटना वाढल्याने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक या गुन्ह्यांचा समांतर तपास करत होते. तपासादरम्यान पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ यांना गोपनीय बातमीदारामार्फत चोरीबाबत ठोस माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे एलसीबीच्या पथकाने कोल्हापूर येथील झेंडा चौक परिसरात दबा धरून सापळा रचला आणि राहुल प्रकाश बामणीकर (वय २९ वर्षे) व सुहास दत्तात्रय जाधव (वय २६ वर्षे, दोघेही रा. बामनी, ता. करवीर, जि. कोल्हापूर) या दोन्ही संशयितांना ताब्यात घेतले.दोन्ही आरोपींकडे पोलिसांनी गुन्ह्यांच्या अनुषंगाने कसून चौकशी केली असता, त्यांनी कणकवली पोलीस ठाणे हद्दीतील दोन्ही मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांची कबुली दिली. या चोरीच्या गुन्ह्यांपैकी एक मोटारसायकल फोंडाघाट मारुतीवाडी येथील रहिवासी महादेव सूर्यकांत भोगटे यांच्या मालकीची होती. आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्यांना कणकवली पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.ही उल्लेखनीय कारवाई सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जामसंडेकर, पोलीस हवालदार ज्ञानेश्वर तवटे, आशिष गंगावणे आणि किरण देसाई यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली. एलसीबीच्या या कामगिरीमुळे परिसरातील दुचाकी चोरांच्या टोळीला मोठा चाप बसला आहे.
konkansamwad 
