श्री क्षेत्र मार्लेश्वरकडे जाणारी वाहतूक ठप्प.....चिखलाच्या साम्राज्यामुळे भाविक व वाहनधारक हैराण

श्री क्षेत्र मार्लेश्वरकडे जाणारी वाहतूक ठप्प.....चिखलाच्या साम्राज्यामुळे भाविक व वाहनधारक हैराण

रत्नागिरी
 

        श्री क्षेत्र मार्लेश्वरकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर ठेकेदाराने रस्त्याच्या कामासाठी मोठ्या प्रमाणात खोदाई केली आहे. त्यातच अचानक झालेल्या पावसामुळे संपूर्ण रस्त्यावर पाणी आणि चिखल साचला असून वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. पर्यायी व्यवस्था अत्यंत थातूरमातूर असल्याने वाहनधारकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.प्राप्त माहितीनुसार, रस्त्याचे काम सुरू असून कामाच्या ठिकाणी कोणतेही सुरक्षा फलक, बॅरिकेड्स किंवा वाहतूक नियंत्रणासाठी कर्मचारी नाहीत. रस्त्यावर गुडघाभर चिखल आणि पाणी साचल्याने दुचाकीस्वारांना तर पायी चालणेही मुश्किल झाले आहे."ठेकेदाराने खोदून ठेवलेला रस्ता तसाच सोडला. पावसाचे पाणी साचून तलाव झाला आहे. मोठी वाहने बेदरकारपणे चालवली जातात आणि लहान वाहनांना वाट काढणे कठीण झाले आहे. प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे," असा संताप वाहनधारकांनी व्यक्त केला.श्री क्षेत्र मार्लेश्वरकडे जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असतें मात्र रस्त्याची झालेली दुरवस्था पाहता मार्लेश्वरकडे जाणारी वाहतूक अक्षरशः ठप्प झाली आहे. अनेक भाविकांची वाहने चिखलात रुतून बंद पडत आहेत.ठेकेदार व प्रशासनाच्या या दुर्लक्षामुळे वाहनचालक आणि सर्वसामान्य जनतेमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून पर्यायी पक्की व्यवस्था करावी , अशी मागणी ग्रामस्थांमधून जोर धरू लागली आहे.