सावंतवाडीत पुन्हा गव्यांचा वावर......माजगाव-मोरडोंगरीत नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
सावंतवाडी
सावंतवाडी शहर आणि माजगाव परिसरात गेल्या काही वर्षांपासून गव्यांचा वावर वाढला आहे. बुधवारी सकाळी मोरडोंगरी परिसरात गव्यांचा कळप नागरी वस्तीजवळ आल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.सकाळच्या वेळी मॉर्निंग वॉकला जाणारे नागरिक आणि शाळेत जाणारी मुले याच रस्त्यावरून ये-जा करतात. त्यामुळे गव्यांचा कळप दिसताच नागरिकांमध्ये घबराट पसरते.गवे हा वन्य प्राणी असून त्याला त्रास दिल्यास परिस्थिती धोकादायक होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी गव्यांच्या जवळ जाणे, त्यांना हुसकावणे किंवा गर्दी करून फोटो काढणे टाळावे, असे आवाहन करण्यात येत आहे.या परिसरात वारंवार गवे येत असल्याने वनविभागाने तातडीने लक्ष घालावे, गव्यांच्या हालचालींवर नजर ठेवावी आणि दीर्घकालीन उपाययोजना करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांमधून होत आहे.
konkansamwad 
