कणकवलीत राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई, गोव्यातील ६ लाखांची विदेशी दारू जप्त
कणकवली
कणकवली येथील दारिस्ते पवारवाडी येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाने गोवा निर्मित विदेशी दारूच्या वाहतुकीवर मोठी कारवाई केली. फोंड्याच्या दिशेने जाणाऱ्या एका सिल्वर रंगाच्या स्विफ्ट कारमधून 6 लाख 10 हजार 130 रुपये किमतीचे 39 बॉक्स विदेशी मद्य जप्त करण्यात आले.निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क कणकवली यांच्या पथकाने दिनांक 10 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 4.30 च्या सुमारास वाहन तपासणी केली असता MH-12-LV-9691 क्रमांकाच्या कारमध्ये विविध ब्रँडच्या गोवा राज्य निर्मित विदेशी मद्याचे बॉक्स आढळले. जप्त करण्यात आलेल्या मद्यासह कार आणि इतर मुद्देमाल मिळून एकूण 12 लाख 10 हजार 130 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. कारची किंमत सुमारे 6 लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले.या प्रकरणी कार चालक नितीन ज्ञानदेव वासुदेव वय 34 वर्षे राहणार कोल्हापूर याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याविरोधात राज्य उत्पादन शुल्क कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.ही कारवाई विभागीय उपआयुक्त श्री. विजय चिंचाळकर आणि अधीक्षक श्रीमती किर्ती शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या पथकात निरीक्षक नितीन शिंदे, श्रीमती स्नेहल कुवेसकर, अजित गावडे जवान आणि हेमंत वस्त जवान-नि-वाहनचालक यांचा समावेश होता. मदतनीस म्हणून साजीद शहा आणि सल्लाउद्दीन खान यांनी सहकार्य केले. सदर गुन्ह्याचा पुढील तपास निरीक्षक नितीन शिंदे करीत आहेत.
konkansamwad 
