वर्दे हत्याकांडातील संशयित आरोपी अवघ्या काही तासांत जेरबंद
कुडाळ
वर्दे येथील महाविद्यालयीन तरुणी दामिनी किरण पालव हिच्या निघृण खून प्रकरणातील संशयित आरोपी साईल विश्राम धुरी याला जेरबंद करण्यात पोलिसांना मोठे यश आले आहे. वेंगुर्ले तालुक्यातील मठ येथील त्याच्या घरातून पोलिसांनी मध्यरात्री १२ वाजण्याच्या सुमारास त्याला ताब्यात घेतले.ओरोस खुर्दनजीक असलेल्या वर्दे गावात काल सायंकाळी ही धक्कादायक घटना घडली होती. हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेणारी दामिनी किरण पालव ही नेहमीप्रमाणे महाविद्यालयातून घरी परतत होती. त्या दिवशी तिचे वडील बाहेर गेल्याने तिला घ्यायला आले नव्हते. याच संधीचा फायदा घेत आरोपीने भरवस्तीत तिच्यावर धारदार चाकूने सपासप वार करून तिची निघृण हत्या केली आणि तिचा मृतदेह रस्त्याच्या बाजूला असलेल्या ओहोळात फेकून घटनास्थळावरून पळ काढला होता. या प्रकारामुळे वर्दे परिसरासह संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात संतापाची लाट उसळली होती.घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहिकर आणि अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. फरार आरोपीच्या शोधासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांची सहा पथके तयार करून जिल्ह्यातील प्रमुख मार्गांवर नाकाबंदी करण्यात आली होती. या शर्थीच्या प्रयत्नांनंतर अवघ्या काही तासांतच आरोपी पोलिसांच्या हाती लागला असून त्याची कसून चौकशी सुरू आहे.
konkansamwad 
