'आजी-आजोबांचं प्रेम म्हणजे शाळेचा खरा ठेवा'.....वेंगुर्लेच्या मदर तेरेसा स्कूलमध्ये आजी-आजोबा दिन साजरा

'आजी-आजोबांचं प्रेम म्हणजे शाळेचा खरा ठेवा'.....वेंगुर्लेच्या मदर तेरेसा स्कूलमध्ये आजी-आजोबा दिन साजरा

वेंगुर्ला

 


       प्रेम, आदर आणि कृतज्ञतेच्या वातावरणात मदर तेरेसा स्कूल, वेंगुर्ला येथे आजी-आजोबा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी सेवानिवृत्त शिक्षक श्री. नंदकिशोर गणेश पिळणकर आणि सौ. निवेदिता पिळणकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. शाळेतील विद्यार्थ्यांनी आकर्षक नृत्ये, समूहगीत, नाटिका आणि आजी-आजोबांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारे विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे काही आजी-आजोबांनीही मंचावर येऊन गीत आणि पसायदान सादर केले. त्यांच्या या उत्स्फूर्त सहभागाला उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.प्रमुख पाहुणे श्री. नंदकिशोर पिळणकर यांनी आपल्या प्रेरणादायी मनोगतात सांगितले, “मुलांमध्ये चांगले संस्कार, नैतिक मूल्ये आणि माणुसकीची जाणीव रुजविणे ही प्रत्येक कुटुंबाची जबाबदारी आहे. आजी-आजोबांचे प्रेम, अनुभव आणि मार्गदर्शन हे मुलांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासासाठी अमूल्य ठरते." शिक्षिका सौ. सोनाली प्रभू यांनी आजी-आजोबांचे कुटुंबातील स्थान, त्याग आणि मुलांच्या जडणघडणीत असलेले त्यांचे अनन्यसाधारण योगदान यावर भाषण केले.शाळेचे मुख्याध्यापक फा. फेलिक्स लोबो यांनी अध्यक्षीय मनोगतात आजी-आजोबांप्रती कृतज्ञता व्यक्त करत, “त्यांच्याकडून मिळणारे संस्कार, शिस्त, प्रेम आणि जीवनमूल्ये हीच मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी खरी संपत्ती आहे” असे सांगितले.कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन शाळेच्या शिक्षकवृंदाने केले. शिक्षिका सौ. ग्लॅनिस पिंटो यांनी आभार मानले. प्रेम, आपुलकी आणि पिढ्यांतील नाते अधिक दृढ करणारा हा कार्यक्रम उपस्थितांच्या कायम स्मरणात राहील अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.