वेंगुर्ले शहर अधिक स्वच्छ सुंदर होण्यासाठी शहरवासियांनी सहकार्य करावे - नगराध्यक्ष दिलीप गिरप

वेंगुर्ले शहर अधिक स्वच्छ सुंदर होण्यासाठी शहरवासियांनी सहकार्य करावे - नगराध्यक्ष दिलीप गिरप

 

 

वेंगुर्ला

 

     घनकचरा अधिनियम २०२६ अंतर्गत कचऱ्याचे ४ प्रकारात वर्गीकरण करण्याचे शासनाचे निर्देश प्राप्त झाले आहेत.त्यानुसार वेंगुर्ले शहरातील नागरिकांनी २ ऐवजी ४ प्रकारात कचरा वर्गिकरण करून द्यावा. याबाबत नगरपरिषद मार्फत, विविध संस्थामार्फत, नागरिकांमार्फत तसेच घंटागाड्याद्वारे नियोजन करण्यात येणार आहे. नागरिकांनी या नवीन शासन आदेशाचे पालन करून वेंगुर्ले शहर अधिक स्वच्छ सुंदर होण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन वेंगुर्ले चे नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप यांनी मंगळवारी आयोजित बैठकीत केले. यावेळी २१ जून रोजी नाटककार मधुसूदन कालेलकर सभागृह येथे "जागतिक योग दिन" साजरा करण्यात येणार आहे. यात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन ही त्यांनी केले.घनकचरा अधिनियम २०२६ अंतर्गत प्राप्त शासन आदेशानुसार नवीन शासननिर्णय माहिती देण्यासाठी व २१ जून रोजी जागतिक योग दिन नियोजन वेंगुर्ला नगरपरिषद स्वामी विवेकानंद सभागृह येथे मंगळवारी सायंकाळी नगराध्यक्ष दिलीप गिरप यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली बैठक संपन्न झाली. यावेळी श्री. गिरप बोलत होते. यावेळी व्यासपीठावर उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर, मुख्याधिकारी हेमंत किरुळकर, विषय समिती सभापती गौरी माईणकर, सचिन शेट्ये, युवराज जाधव, उपसभापती रिया केरकर, योगाच्या संचालिका डॉ. वसुधा मोरे आदी उपस्थित होते. तसेच नगरसेवक, नगरसेविका, विविध संस्था प्रतिनिधी, व्यापारी, तसेच अधिकारी, कर्मचारी, नागरिक उपस्थित होते. २१ जून रोजी जागतिक योग दिन बाबत डॉ. वसुधा मोरे यांनी माहिती दिली. यावेळी नागरिकांनी विविध सूचना मांडल्या. कार्यक्रमांची सुरुवात नगराध्यक्ष दिलीप गिरप यांच्या हस्ते स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाली. सूत्रसंचालन गणेश कांबळी यांनी केले.