बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयात तृतीय वर्ष विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न

वेंगुर्ला
बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयात जिमखाना विभागाच्या वतीने तृतीय वर्ष कला, वाणिज्य, विज्ञान या वर्गाचा विद्यार्थ्यांसाठी शुभेच्छा समारंभ आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. वामन गावडे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून स. का. पाटील महाविद्यालय मालवण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवराम ठाकूर हे उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर डॉ. प्रा. विलास देऊलकर इतिहास विभाग प्रमुख, क्रिडासंचालक प्रा. जे. वाय. नाईक, डॉ. प्रा. पी. आर. गावडे, मराठी विभागप्रमुख डॉ.सौ. धनश्री पाटील उपस्थित होते. यावेळी प्रमुख पाहुणे डॉ. शिवराम ठाकूर यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांना जीवनात यशस्वी होण्यासाठी आत्मविश्वासाने आपल्या ध्येयाला सामोरे जा असे संबोधले व योग्य प्रकारे नियोजन करून चांगले नाव कमवा व कठोर परिश्रमाला स्पर्धात्मक युगात पर्याय नाही असा संदेश दिला. तसेच शासकीय नोकरीची विद्यार्थ्यांनी वाट न पाहता शेतीवर अवलंबून असणारे उद्योगधंदे यामध्ये परिश्रम घेऊन आपला विकास साधावा असे मनोगत मध्ये त्यांनी व्यक्त केले व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष वामन गावडे यांनी विद्यार्थ्यांनी आपले गुणवत्तेत वाढ करावी व चौफेर वाचन करून आपल्या ज्ञानात भर घालावी व स्पर्धा परिक्षेला सामोरे जावे असा संदेश दिला.या कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम.बी. चौगुले यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी चातुर्य तांडेल, प्रीती मेरे, रेणुका कारेकर, सुनिल काळे, सोनाली चेंदवणकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच प्रा. एस. जी. चुकेवाड, प्रा. जे. वाय. नाईक, डॉ. धनश्री पाटील, प्रा. पी. आर. गावडे, प्रा. डॉ. सचिन परूळेकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. वरील मान्यवरांच्या उपस्थितीत महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी व स. का. पाटील मालवण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवराम ठाकूर यांचा महाविद्यालयाच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला तृतीय वर्ष कला, वाणिज्य व विज्ञान विभागाचे विद्यार्थी व प्राध्यापक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.