कुडाळ पावशी येथे मोफत दिव्यांग शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांच्या हस्ते उद्घाटन

कुडाळ
भारत विकास परिषद विकलांग केंद्र पुणे यांच्या वतीने सेवा भरती सिंधुदुर्ग जिल्हा यांच्या सहयोगाने आणि महाराष्ट्र नॅचरल गॅस यांच्या सी.एस.आर. निधी अंतर्गत आज पावशी येथील शांतादुर्गा हॉल मध्ये मोफत दिव्यांग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला दिव्यांग बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सुमारे १८० दिव्यांग बांधवांनी याचा लाभ घेतला. या दिव्यांग बांधवांना सुमारे ५० हजार रुपयांपेक्षा जास्त किंमत असलेला कृत्रिम मॉड्युलर पाय आणि हात व कॅप्लर मोफत दिला जाणार आहे. त्यासाठी आज त्यांची मापे घेण्यात आली.या मोफत दिव्यांग शिबिराचे उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी आणि उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून आणि भारतमाता प्रतिमाचे पूजन करून झाले. यावेळी व्यासपीठावर मनीष दळवी यांच्यासह भारत विकास परिषद विकलांग केंद्र पुणेचे विश्वस्त आणि केंद्र प्रमुख विनय खटावकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा कार्यवाह लवू म्हाडेश्वर, सेवा भारती जिल्हाध्यक्ष डॉ. गुरुप्रसाद सवदत्ती, शिबीर प्रमुख श्रीकृष्ण शिरोडकर आदी उपस्थित होते. उद्घाटन सोहळा सुरु होण्यापूर्वीपासूनच उपस्थित दिव्यांग बांधवांची पायाची आणि हाताची मापे घेण्यात आली. या सर्व दिव्यांग बांधवाना १९ एप्रिल २०२५ ला सकाळी १० वाजता पुणे येथे होणाऱ्या शिबिरात हे हात आणि पाय बसविले जाणार असून येत्या १४ मे ला कुडाळ मध्ये दिव्यांग बांधवांसाठी हात बसविण्याचे शिबीर देखील होणार अशी माहिती भारत विकास परिषद विकलांग केंद्र पुणेचे विश्वस्त आणि केंद्र प्रमुख विनय खटावकर यांनी यावेळी दिली.सोहळ्याला मार्गदशन करताना जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी म्हणाले, या दिव्यांग बांधवांसाठी जिल्हा बँक सर्वतोपरी प्रयत्न करेल. हे शिबीर आयोजित करून दिव्यांग बांधवाना मोफत सेवा उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी आयोजकांचे कौतुक केले. १४ मे रोजी जे शिबीर होईल ते जिल्हा बँकेच्या ओरोस येथील प्रांगणात घ्यावे, अशी सूचना देखील त्यांनी आयोजकांना केली.या कार्यक्रमाला जयेश खाडिलकर, बाळकृष्ण परब, सद्गुरू दादा, राजेंद्र पाटील, डॉ. संजय निगुडकर, अनिल शिंगाडे, अनिकेत वालावलकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल जोशी यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. गुरुप्रसाद सवदत्ती यांनी केले. या मोफत दिव्यांग शिबिरासाठी जिल्हाभरातून सुमारे २०० दिव्यांग बांधव उपस्थित होते.