कुडाळ तालुक्यात झालेल्या घरफोड्यांचा तपास लावण्यात सिंधुदुर्ग पोलिसांना यश

कुडाळ
कुडाळ तालुक्यातील पिंगुळी, काळेपाणी, झाराप आणि साळगाव अशा विविध ठिकाणी झालेल्या ६ घरफोडीच्या गुन्ह्यांचा तपास लावण्यात कुडाळ पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी गुन्हेगार असलेल्या रामचंद्र उर्फ अभय अंकुश घाडी (रा. आकेरी-घाडीवाडी) या संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तपासादरम्यान आपण या चोऱ्या केल्या अशी त्यांनी कबुली दिली असून चोरीला गेलेला साडेतीन लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून अन्य चोरांचा तपास सुरू आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहीकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या काही दिवसात कुडाळ शहर व परीसरात अनेक ठिकाणी बंद घरांना चोरांनी लक्ष केलेले होते तसेच मौल्यवान वस्तुंच्या चोरीच्या घटनेमध्ये वाढ देखील झालेली होती. घरफोडी चोरीच्या गुन्हयांना आळा बसावा, चोरीचे गुन्हे उघडकीस येऊन चोरी झालेली मालमत्ता हस्तगत होणे आवश्यक होती. घरफोडी, चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याकरीता पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहीकर, अपर पोलीस अधीक्षक कृषिकेश रावले यांनी सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना सुचना दिलेल्या. वरीष्ठांनी दिलेल्या सुचनांप्रमाणे कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदुम यांनी कुडाळ कार्यक्षेत्रात झालेल्या चोरी, घरफोडीचे गुन्हे उघडकीस येण्याकरीता विशेष तपास पथके तयार केली. पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी आपले गोपनीय स्त्रोत सक्रिय केले. कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार प्रमोद काळसेकर यांना गोपनीय स्त्रोतांमार्फत एक संशयित इसम दुचाकीवरुन परीसरात फिरत असल्याची माहिती व फोटो मिळाला. दुचाकीच्या माहितीवरून संशयिताचा शोध घेतला असता त्याचे नाव रामचंद्र ऊर्फ अभय अंकुश घाडी (रा. आकेरी, घाडीवाडी ता. कुडाळ) असे असल्याचे समजुन आले. पोलीसांनी अभिलेखाची पडताळणी केली असता त्याच्यावर सावंतवाडी पोलीस ठाण्यात घरफोडीचे तीन गुन्हे दाखल असल्याची माहीती मिळून आली. यावरुन या संबंधिताचा चोरीच्या गुन्ह्यात सहभाग असण्याची शक्यता असल्याने त्याचा शोध घेण्यात आला. यावेळी तो झाराप झिरो पॉईंट या ठिकाणी येणार असल्याची माहीती प्राप्त झाल्यानंतर त्यास सापळा रचुन पोलीस निरीक्षक मगदुम व पथकाने शिताफीने ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान संशयितास विश्वासात घेवुन तपास करता त्याने गेल्या काही दिवसात पिंगुळी सुधा रेसिडेन्सी, पिंगुळी उत्कर्षनगर, पिंगुळी काळेपाणी, पिंगुळी मोडकावड चिंदरकरवाडी, झाराप तिठा व साळगाव खेरवाडी अशा एकूण सहा ठिकाणी बंद घराचे कुलुप तोडून गुन्हे केल्याची कबुली दिली. आरोपीकडून चोरीस गेलेल्या तीन अँड्रॉइड टीव्ही, २७ ग्रॅम सोन्याचे दागिने, १३ हजारचे चांदीचे दागिने, ३ मोबाईल फोन, १ टॅब, २ सोनी कंपनीचे कॅमेरे, १ रेडीओ, १ स्पिकर, १ वजनकाटा, ४३ हजार रोख रक्कम तसेच गुन्हा करण्याकरीता वापरलेल्या २ लोखंडी कटावण्या, २ स्क्रू ड्रायव्हर, २ पक्कड, १ कटर, गुन्ह्यासाठी वापरलेली दुचाकी असा एकूण ३ लाख ५० हजार किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. संशयितास न्यायालयात हजर केले असता त्याची ४ दिवसाची पोलीस कोठडी मंजुर केलेली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहीकर, अपर पोलीस अधीक्षक कृषीकेश रावले व कणकवली उप विभागीय पोलीस अधिकारी घनशाम आढाव यांच्या मार्गदर्शनाखाली कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदुम, सहा. पोलीस निरीक्षक पालवे, पोलीस उपनिरीक्षक भांड, पोलीस अंमलदार प्रमोद काळसेकर, कृष्णा केसरकर, रामदास गोसावी, योगेश वेंगुर्लेकर, गणेश चव्हाण, महेश भोई, योगेश मांजरेकर, शशीशेखर प्रभु, योगिता गोलतकर यांनी केली आहे.