तिरोडा येथे पाच दिवसीय सुलेखन कार्यशाळेस उत्स्फूर्त प्रतिसाद

सावंतवाडी
बी.एस. बांदेकर कॉलेज ऑफ फाईन आर्ट (सावंतवाडी) आणि श्री देव पाटेकर पंचायतन, तिरोडा यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा, तिरोडा क्र. १ येथे पाच दिवसीय सुलेखन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेस अगदी लहान मुलांपासून किशोरवयीन ५५ विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. कार्यशाळेचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून सुप्रसिद्ध सुलेखनकार आणि बी.एस. बांदेकर महाविद्यालयाचे प्रा. सिद्धेश नेरुरकर यांनी विद्यार्थ्यांना रेषा, पॅटर्न, अक्षरांची रचना आणि सौंदर्यशास्त्र याविषयी अतिशय सुलभ व खेळीमेळीच्या पद्धतीने मार्गदर्शन केले. नर्सरीमधील चिमुकल्यांपासून ते इयत्ता १० वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी अक्षरलेखनाच्या विविध शैली आत्मसात करत, रेषाखंडांच्या साहाय्याने सौंदर्यपूर्ण अक्षरांची रचना करणे अनुभवले. पाच दिवसांच्या या कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी केवळ अक्षरलेखन शिकून घेतले नाही, तर त्यांच्या मनातील शंका, जिज्ञासा यांना उत्तर देत नेरुरकर सरांनी त्यांच्या प्रतिभेला दिशा दिली. प्रत्येक सत्रात कला आणि अक्षरशिल्पांच्या प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांमुळे मुले भारावून गेली. श्री देव पाटेकर पंचायतनच्या सामाजिक वारसा शिक्षण, संस्कार आणि सृजनशीलतेचा असल्याने तिरोडा परिसरातील विद्यार्थ्यांना नवसंजीवनी मिळत आहे.पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना आणि युद्धात शहीद झालेल्या आपल्या देशाच्या सैनिकांना सुलेखनाच्या माध्यमातून श्रद्धांजली अर्पण करून तसेच सर्व विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते सहभाग प्रमाणपत्र देत या कार्यशाळेचा समारोप करण्यात आला.सुलेखन कार्यशाळेच्या निमित्तान विद्यार्थ्यांच्या मनात अक्षरांचे सौंदर्य रुजवण्याचे आणि सर्जनशीलतेला वाव देण्याचे कार्य या माध्यमातून घडले, हीच या उपक्रमाची सर्वात मोठी उपलब्धी ठरली. याप्रसंगी बी. एस. बांदेकर कॉलेज चे प्राचार्य उदय वेले, तिरोडा नंबर १ च्या शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, सरपंच, उपसरपंच, सहकारी वर्ग, विद्यार्थ्यांचे पालक, तिरोडा पोलीस पाटील उपस्थित होते. सदर कार्यशाळेसाठी पुढाकार घेऊन श्री देव पाटेकर पंचायतन, तिरोडा यांनी आणि बी एस बांदेकर कला महाविद्यालयाचे संस्थाध्यक्ष रमेश भाट यांनी या कार्यशाळेसाठी शुभेच्छा दिल्या.