जम्मू काश्मीरमध्ये चकमकीत ३ दहशतवाद्यांचा खात्मा.

जम्मू काश्मीरमध्ये चकमकीत ३ दहशतवाद्यांचा खात्मा.

श्रीनगर.

  जम्मू काश्मीरच्या कुपवाडामध्ये भारतीय लष्कराच्या जवानांना ३ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आले आहे. दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या चकमकीत तिघांचा खात्मा करण्यात आला आहे. २ दहशतवाद्यांचा राजौरी तर एकाचा कुपवाडा सीमेजवळ खात्मा करण्यात आला. खराब हवामानाचा फायदा घेत दहशतवाद्यांकडून घुसखोरीचा प्रयत्न केला जात होता. पण त्यांचा प्रयत्न जवानांनी उधळवून लावला. विधानसभा निवडणुका सुरू असताना लष्कराकडून केलेली ही महत्वाची कारवाई मानली जात आहे.
   मिळालेल्या माहितीनुसार, जम्मू काश्मीरमध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. जवानांनी ३ दहशतवाद्यांना ठार केले. माछिलमध्ये २ आणि तंगधारमध्ये एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला आहे. मध्यरात्री जवानांना दहशतवाद्यांच्या संशयित हालचाली दिसून आल्या. त्यानंतर लष्कर आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई केली. यावेळी दहशतवादी आणि जवानांमध्ये चकमक सुरू झाली. ३ दहशतवाद्यांचा जवानांनी खात्मा केला. सध्या तंगधार आणि माछिलमध्ये जवानांकडून सर्च ऑपरेशन सुरू आहे. ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांचे मृतदेह अद्याप सापडले नाही.
   या परिसरामध्ये आणखी दहशतवादी लपून बसल्याची शक्यता आहे. दुसरीकडे राजौरीमध्ये लष्कराकडून शोध मोहीम सुरू आहे. याठिकाणी २ ते ३ दहशतवादी लपल्याची शक्यता आहे. बुधवारी राजौरीमध्ये दहशतवादी आणि जवानांमध्ये चकमक झाली. दहशतवादी एलओसीवरून तंगधार सेक्टरमध्ये घुसखोरी करू शकतात अशी माहिती जवानांना मिळाली होती. त्यामुळे एलओसीवर मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दहशतवादी जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. सध्या जम्मू-काश्मीरमध्ये सगळीकडे पोलिस आणि लष्कराच्या जवानांकडून कडक बंदोबस्त आहे.