अंगुलीमुद्रांनी दिला धागा अन् २४ तासांत घरफोडीचा छडा......३१.५ तोळे सोन्याच्या चोरीचा तपास.....११ तोळे सोने घरातूनच हस्तगत, हातोडा-पारई जप्त
वेंगुर्ला
घरफोडीच्या घटनेनंतर घटनास्थळी सापडलेल्या अंगुलीमुद्रांनी तपासाला महत्त्वाचा धागा दिला आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व वेंगुर्ला पोलिसांच्या पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवत अवघ्या 24 तासांत तब्बल 31.5 तोळे सोन्याच्या चोरीचा गुन्हा उघडकीस आणला. या प्रकरणात एका 17 वर्षीय विधीसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्या चौकशीत साथीदाराचे नाव समोर आले आहे. चोरीच्या सोन्यापैकी 11 तोळे सोने फिर्यादीच्या घरातूनच हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.घरच्या दर्शनी दरवाजाची कडी तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला आणि तब्बल 15 लाख 97 हजार रुपये किमतीचे 31.5 तोळे सोन्याचे दागिने लंपास केले. घरफोडी लक्षात आल्यानंतर वेंगुर्ला पोलीस ठाण्यात गु.र.नं. 154/2026 अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम 305(अ), 331(3), 331(4) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.गुन्हा दाखल होताच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि वेंगुर्ला पोलिसांनी संयुक्त तपास सुरू केला. घटनास्थळाची बारकाईने पाहणी करताना पोलिसांना काही अंगुलीमुद्रा मिळून आल्या. या अंगुलीमुद्रांचे विश्लेषण करताना अंगुलीमुद्रा विश्लेषक सपोनि श्री. मागाडे यांनी अथक प्रयत्न केले.या विश्लेषणातून मिळालेल्या महत्त्वाच्या धाग्याच्या आधारे पोलिसांनी संशयितापर्यंत पोहोचण्यास सुरुवात केली. तपासाची चक्रे वेगाने फिरवत पोलिसांनी उभादांडा-आडारी परिसरातील 17 वर्षीय विधीसंघर्षग्रस्त बालकाला शिताफीने ताब्यात घेतले.ताब्यात घेतलेल्या बालकाची सखोल चौकशी करण्यात आली. चौकशीदरम्यान त्याने सदर घरफोडी उमेश प्रल्हाद पेडणेकर (वय 18, रा. उभादांडा-आडारी, ता. वेंगुर्ला) याच्यासोबत केल्याचे सांगितल्याची माहिती पोलिसांनी दिली.तपासात पुढे आणखी एक महत्त्वाची बाब समोर आली. चोरीस गेलेल्या सोन्यापैकी 11 तोळे सोने फिर्यादीच्या घरातूनच मिळून आले. उर्वरित सोन्यापैकी काही सोने सोनाराला विक्री केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे उर्वरित सोन्याचा माग काढण्यासाठी पोलिसांनी तपास अधिक गतिमान केला आहे.केवळ चोरीचे सोनेच नव्हे, तर घरफोडीसाठी वापरण्यात आलेली साधनेही पोलिसांनी हस्तगत केली आहेत. संशयितांकडून एक लोखंडी हातोडा आणि एक लोखंडी पारई जप्त करण्यात आली आहे. त्यामुळे घराची कडी नेमकी कशा पद्धतीने तोडण्यात आली, याबाबतच्या तपासालाही महत्त्वाचे पुरावे मिळाले आहेत.आता पोलिसांसमोर सर्वात मोठे आव्हान आहे ते उर्वरित सोन्याचा शोध घेण्याचे आणि विक्री झालेल्या सोन्याचा माग काढण्याचे. सोनाराकडे विक्री करण्यात आलेल्या सोन्याची माहिती, त्याची विल्हेवाट आणि या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का, या सर्व दिशांनी तपास सुरू आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली संयुक्त तपास ही कारवाई पोलीस अधीक्षक मोहन दहिकर आणि अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली करण्यात आली.स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे, पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ, ASI सुरेश राठोड, हेड कॉन्स्टेबल विल्सन डिसोझा, आशिष जामदार, पोलीस कॉन्स्टेबल महेश समजिस्कर, अमर कांडर तसेच वेंगुर्ला पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी, , हेड कॉन्स्टेबल योगेश सराफदार, पोलीस कॉन्स्टेबल जयेश सरमळकर, आकाश घाटगे आणि पंकज पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.
konkansamwad 
