पश्चिम बंगालमध्ये भीषण रेल्वे अपघात; कंचनजंगा एक्स्प्रेसला मालगाडीची धडक.
कोलकत्ता.
पश्चिम बंगालमध्ये एक मोठा रेल्वे अपघात घडला आहे. येथे उभ्या असलेल्या कंचनजंगा एक्स्प्रेसला एका मालगाडीने मागून धडक दिली. या घटनेनंतर रेल्वेच्या मागील तीन बोगींचे मोठे नुकसान झाले आहे. या अपघातात काही प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. कांचनजंगा एक्सप्रेसला रंगपाणी ते निजाबारी दरम्यान हा अपघात झाला आहे. ही गाडी सियालदहला जात असल्याची माहिती आहे.
ही गाडी निजबारीसमोर उभी असताना भरधाव वेगात असलेल्या मालगाडीने पाठीमागून धडक दिली. ज्यामध्ये गाडीची तीन डबे रुळावरुन उतरले तर एका डब्याला आग लागली. घटनेची माहिती मिळताच पोलिस, रेल्वे अधिकारी आणि प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून मदतकार्य सुरू करण्यात आले आहे. गाडीच्या डब्यांमध्ये अडकलेल्या प्रवाशांची सुटका करण्यात येत आहे. कंचनजंगाच्या तीन बोगींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले असून मदत आणि बचाव कार्य सुरू आहे, अशी माहिती प्रत्यक्षदर्शीने दिली आहे. रंगा पाणी आणि निजबारी स्थानकादरम्यान हा अपघात झाला आहे. ही ट्रेन न्यू जलपाई गुडीहून निघाली होती आणि किशनगंज मार्गे सियालदाहला जात होती. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी घटनास्थळी एक टीम पाठवली आहे.
एका प्रत्यक्षदर्शी प्रवाशाने सांगितले की, ते ट्रेनमध्ये बसले होते तेव्हा मागून जोरदार धक्का बसला. त्यांना काही समजण्यापूर्वीच प्रवासी घाबरुन इकडे-तिकडे पळू लागले. सगळीकडून किंचाळण्याचा आवाज ऐकू येत होते. ते ट्रेनमधून खाली उतरले आणि मागे धावत गेले. गाडीच्या मागच्या बाजुला खूप गर्दी होती. तेव्हा कळालं की गाडीला अपघात झाला आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, रूळ आणि गाडीमध्ये अडकलेल्या प्रवाशांची सुटका करण्यात आली असून त्यांना जवळच्या रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. तर, मृतदेह बाहेर काढून पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. प्रवाशांची ओळख पटवली जात आहे. हा रेल्वे अपघात कसा झाला, याची चौकशी करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. घटनास्थळी पोहोचलेल्या अधिकाऱ्यांनी लोको पायलटची चौकशीही सुरू केली आहे. मालगाडीचा चालकही गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे.