२० महिन्यांच्या श्रीजा राणेचा 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स' मध्ये झळकदार विक्रम......२३ मिनिटांत २०७ चित्रे ओळखून पटकावला 'IBR Achiever' किताब

२० महिन्यांच्या श्रीजा राणेचा 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स' मध्ये झळकदार विक्रम......२३ मिनिटांत २०७ चित्रे ओळखून पटकावला 'IBR Achiever' किताब

भिरवंडे

 

     सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारी कामगिरी भिरवंडे-बिवणेवाडी येथील चिमुकलीने केली आहे. श्रीजा नम्रता अतुल राणे या अवघ्या १ वर्षे ८ महिन्यांच्या चिमुकलीने इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये आपले नाव सुवर्णाक्षरांनी कोरले आहे.श्रीजाने अवघ्या २३ मिनिटे २४ सेकंदांत तब्बल २०७ चित्रे अचूक ओळखून त्यांच्याकडे बोट दाखवत 'IBR Achiever' हा मानाचा किताब पटकावला आहे. या विक्रमाची अधिकृत पडताळणी २७ ऑगस्ट २०२६ रोजी करण्यात आली.श्रीजाने ओळखलेल्या चित्रांमध्ये २४ प्राणी, २० फळे, १८ खाद्यपदार्थ, १७ घरगुती वस्तू, १५ स्वयंपाकघरातील वस्तू, १२ भाज्या, १० खेळणी, १० बाथरूममधील वस्तू, १० निसर्गाशी संबंधित गोष्टी, ९ पक्षी, ९ वाहने, ९ वैयक्तिक काळजीच्या वस्तू, ८ इलेक्ट्रॉनिक वस्तू, ८ कपडे, ७ फर्निचर, ७ शरीराचे अवयव, ५ ॲक्सेसरीज, ५ लहान मुलांच्या वस्तू आणि ४ शालेय वस्तूंचा समावेश आहे.या विक्रमापेक्षाही कौतुकास्पद आहे ते श्रीजाच्या आई-वडिलांचे संगोपन. आज लहान मूल रडले की मोबाईल हातात देण्याची सवय अनेक घरात असताना, राणे दाम्पत्याने श्रीजाला आजपर्यंत मोबाईल दिलेलाच नाही.मोबाईलऐवजी तिला मराठी पुस्तके, खेळणी, घरातील वस्तू आणि निसर्गाच्या सान्निध्यात वाढवले गेले. इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सच्या प्रक्रियेसाठी आईने लॅपटॉपचा वापर केला, पण शिकण्यासाठी मुलीच्या हाती मोबाईल दिला नाही.हा विक्रम केवळ श्रीजाच्या बुद्धिमत्तेचा नसून जागरूक पालकत्व आणि संस्कारांचा विजय आहे. लहान वयात मोबाईलऐवजी पुस्तक आणि प्रत्यक्ष अनुभव दिल्यास मुलांच्या ज्ञानाला किती सुंदर दिशा मिळते, याचे श्रीजा हे प्रेरणादायी उदाहरण आहे.या ऐतिहासिक कामगिरीबद्दल चिमुकली श्रीजा आणि तिचे आई-वडील नम्रता व अतुल राणे यांचे सर्वत्र अभिनंदन होत असून भिरवंडे गावासह संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याला तिचा अभिमान आहे.