एसटी महामंडळाच्या सीएनजी बसेस सिंधुदुर्गात दाखल

कुडाळ
एसटी महामंडळाच्या सीएनजी बसेस सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल झाल्या असून कुडाळ एसटी आगाराला 5 सीएनजी बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या आगारासाठी एकूण 50 सीएनजी बसेसची मागणी करण्यात आली असून, उर्वरित बसेस टप्प्या टप्प्याने दाखल होणार आहेत तसेच लवकरच कुडाळ डेपोत सीएनजी गॅस पंप उभारण्यात येणार आहे, अशी माहिती आगार प्रमुख रोहीत नाईक यांनी दिली.वाढते प्रदूषण रोखण्यासाठी आणि डिझेलचे वाढते दर यामुळे होणारा एसटी महामंडळाचा तोटा कमी करण्याच्या उद्देशाने राज्यात एक हजार एसटी बसेस सीएनजी गॅसवर चालविण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला असून सिंधुदुर्गातही आता सीएनजी बसेस रस्त्यावर धावणार आहेत. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील कणकवली, कुडाळ आणि वेंगुर्ले या तीन आगारांना प्रत्येकी 50 अशा एकूण 150 सीएनजी एसटी देण्यात येणार, या आगाराच्या गाड्या सीएनजी परिवर्तनासाठी ठाणे, मुलूंड येथे कंपनीकडे टप्प्या टप्प्याने पाठविण्यात येत आहेत. या परिवर्तीत केलेल्या बसेस कणकवली विभागीय कार्यालय येथे दाखल झाल्यानंतर, त्या त्या आगारांना उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. दरम्यान कुडाळ आगारात पहिलीच सीएनजी बस दाखल झाल्यानंतर तिची आकर्षक सजावट करण्यात आली.कुडाळ एसटी डेपोत स्वमालकीचा सीएनजी पंप एसटी प्रशासनाकडून उभारण्यात येणार असून याचा करारही झालेला आहे. लवकरच कामाला सुरुवात होईल. येत्या सहा महिन्यांत हा पंप उभारण्यात येईल. तोपर्यंत कुडाळ तालुक्यातील झाराप पेट्रोलपंप येथे या बसमध्ये सीएनजी फिलिंग करण्यात येणार असल्याची माहीती नाईक यांनी दिली.