बॅनरमुक्त वेंगुर्ल्याकडे वाटचाल.....शुभेच्छा व जाहिरातींसाठी एलईडी स्क्रीनवर २० सेकंदांची संधी
वेंगुर्ला
आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वेंगुर्ला शहर बॅनरमुक्त करण्याचा निर्णय नगरपरिषदेने घेतला आहे. यासाठी शहरात पाच ठिकाणी एलईडी स्क्रीन बसविण्यात येणार आहेत.नगरपरिषदेच्या स्वामी विवेकानंद सभागृहात दि. २० ऑगस्ट रोजी लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि नागरिकांची संयुक्त बैठक झाली होती. या बैठकीत स्वच्छता, वाहतूक व पार्किंग व्यवस्थेसोबतच सार्वजनिक ठिकाणी लावण्यात येणाऱ्या अनधिकृत बॅनर आणि होर्डिंग्जवर चर्चा करण्यात आली. यावेळी गणेशोत्सवापासून शहर बॅनरमुक्त करण्याचा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला.शहरातील रस्ते व सार्वजनिक ठिकाणी बेकायदेशीरपणे लावण्यात येणारे होर्डिंग्ज, बॅनर्स हटविण्याबाबत जनहित याचिका PIL क्र. 155/2011 अनुषंगाने न्यायालयाने नगरपरिषद, पोलीस व राज्य शासनास आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्देशांचे पालन करण्यासोबतच नागरिकांना पर्यायी माध्यम उपलब्ध करून देण्यासाठी एलईडी स्क्रीनचा निर्णय घेण्यात आला आहे.शहरातील दाभोली नाका, पिराचा दर्गा, बाजारपेठ, हॉस्पिटल नाका आणि कॅम्प अग्निशमन केंद्र या पाच प्रमुख ठिकाणी या एलईडी स्क्रीन बसविण्यात येणार आहेत. या माध्यमातून गणेशोत्सवाच्या शुभेच्छा, व्यावसायिक जाहिराती तसेच नगरपरिषदेच्या स्वच्छता व जनजागृतीपर संदेशांचे डिजिटल स्वरूपात प्रसारण करता येणार आहे.दि. २५ ऑगस्ट रोजी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत जाहिरातीसाठी दर निश्चित करण्यात आले आहेत. एक आठवड्यासाठी २,००० रुपये, पंधरा दिवसांसाठी ३,००० रुपये आणि एक महिन्यासाठी ५,००० रुपये असे दर असून, जाहिरात सर्व स्क्रीनवर किमान २० सेकंद प्रदर्शित करण्यात येणार आहे.या उपक्रमामुळे शहराचे विद्रुपीकरण टाळण्यास मदत होणार असून, नगरपरिषदेच्या उत्पन्नातही वाढ होणार आहे. शहर स्वच्छ, सुंदर व शिस्तबद्ध ठेवण्यासाठी नागरिकांनी अनधिकृत बॅनर न लावता एलईडी स्क्रीनचा वापर करावा, असे आवाहन नगराध्यक्ष व प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
konkansamwad 
