मोती तलावात उडी घेतलेल्या युवकासह युवतीची ओळख पटली
सावंतवाडी
शहरातील श्रीराम वाचन मंदिर समोर मोती तलावात एका शाळकरी युवतीने उडी घेतल्यानंतर लगेचच एका युवकानेही उडी घेतल्याचा प्रकार दुपारी बारा साडेबाराच्या दरम्यान घडला होता.हा प्रकार पाहताच उपस्थितांनी त्या ठिकाणी धाव घेत युवकाला पाण्यातून बाहेर काढले. मात्र तो मृत झाल्याचे निदर्शनास आले. रोहन गोसावी (२५, रा. सरदारवाडी, नाधवडे, ता. वैभववाडी) असे या युवकाचे नाव आहे.तर संबंधित युवतीचे नाव लिशा भिकाजी गोसावी (१५, रा. कारीवडे, ता. सावंतवाडी) असे असून या युवतीचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. बाबल आल्मेडा रेस्क्यू टीम दाखल झाली असून मोती तलावाच्या पाण्यात शोध सुरू आहे.दरम्यान, ते दोघे नातेवाईक असल्याचे तिथे असलेल्या अन्य एका युवतीकडून सांगण्यात आले. ती पाण्यात पडताच रोहन याने तिला वाचवण्यासाठी उडी घेतली मात्र त्यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.मात्र सदर युवतीने उडी का घेतली याबाबत अधिक माहिती मिळू शकली नाही. तिने उडी घेतली की पाय घसरून पडली याबाबतही अद्याप स्पष्टता झाली नव्हती. या घटने पूर्वी तिने तलावाच्या रेलिंगवर बसून काढलेला फोटो प्राप्त झाला आहे. त्यामुळे तिने नेमकी कशासाठी उडी घेतली की पाण्यात पडली याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे. घटनास्थळावर त्यांच्यासोबत असलेल्या अन्य एका युवतीकडून पोलीस माहिती घेत आहेत.
konkansamwad 
