नामवंत भजनकार समीर कदम बुवा यांचे अकस्मात निधन; भजन क्षेत्रात हळहळ

नामवंत भजनकार समीर कदम बुवा यांचे अकस्मात निधन; भजन क्षेत्रात हळहळ

कुडाळ

 

     तालुक्यातील पोखरण गावचे नामवंत भजनकार आणि गुरुदास सांप्रदायाचे खंदे पुरस्कर्ते ह.भ.प. समीर कदम बुवा (रा. पोखरण) यांचे रविवारी पहाटे २.१५ वाजण्याच्या सुमारास अकस्मात निधन झाले.त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच पोखरण परिसरासह संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भजनप्रेमी आणि सांप्रदायिक क्षेत्रात मोठी हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या निधनाबद्दल पालकमंत्री नितेश राणे, कुडाळ-मालवणचे माजी आमदार वैभव नाईक यांच्यासह अनेक मान्यवरांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.कदम बुवा यांनी आपल्या अत्यंत मधुर, सुरेल आणि भावस्पर्शी गायकीने अवघ्या कोकणातील श्रोत्यांच्या मनात हक्काचे स्थान मिळवले होते. 'भजन हाच श्वास आणि भक्ती हीच ओळख' असा ध्यास घेऊन त्यांनी आयुष्यभर सांप्रदायिक सेवा केली. विविध धार्मिक आणि सांस्कृतिक मंचांवरून त्यांनी सादर केलेल्या भजनांनी हजारो रसिकांना मंत्रमुग्ध केले होते. त्यांच्या जाण्याने कोकणातील भजन परंपरेची कधीही भरून न निघणारी हानी झाली आहे.त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, भाऊ आणि काका असा मोठा परिवार आहे.