मुंबईतील एल्फिन्स्टन पूल वाहतुकीसाठी बंद

मुंबईतील एल्फिन्स्टन पूल वाहतुकीसाठी बंद

 

मुंबई

 

         परळ व प्रभादेवी परिसरास जोडणारा महत्त्वाचा आणि 125 वर्ष जूना असलेला ब्रिटीशकालीन एल्फिन्स्टन पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. वरळी-शिवडी एलिव्हेटेड मार्गाच्या कामासाठी एल्फिस्टन रेल्वे पूल पाडण्यात येणार आहे. एल्फिस्टन हा पूल पुढची दोन वर्ष वाहतूकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. यामुळे स्थानिक रहिवासी हे रस्त्यावर उतरले असून आंदोलन करत आहेत. मुंबई महानगर विकास प्राधिकरणामार्फत हा पूल तोडून नवीन उड्डाणपूल बांधण्यात येणार असून तो वांद्रे- वरळी सागरी सेतूला थेट अटल सेतूशी शिवडी येथे जोडण्यात येणार आहे. मुंबई पोलिसांनी 8 एप्रिलला अधिसूचना काढून वाहतुकीसाठी एल्फिन्स्टन पूल बंद करण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. वाहतूक कोंडी रोखण्यासाठी पर्यायी मार्गाची व्यवस्था करण्यात आल्याचेही पोलिसांनी सांगितले.नवे पूल बांधण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. एल्फिन्स्टन ब्रिजवरील वाहतूक तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आली असून ही वाहतूक इतर मार्गान वळविण्यात आली आहे. यामध्ये एल्फिन्स्टन पुलाचा वापर करून पूर्व पश्चिम दिशांना जाणाऱ्या वाहनांना पर्यायी वाहतूक मार्गाची सोय करण्यात आली आहे. तसेच काही मार्ग एकेरी करण्यात आले आहेत, तर काही ठिकाणी नो पार्किंग झोन घोषित करण्यात आलाय. दादर पूर्वेकडून पश्चिमकडे व दादर मार्केटकडे जाणारे वाहनचालक हे टिळक पुलाचा वापर करतील. परळ पूर्वेकडून प्रभादेवी व लोअर परळ जाणारे वाहनचालक हे करी रोड पुलाचा वापर करतील (सकाळी ७ वा. ते दुपारी ३ वा. पर्यंत), परळ, भायखळा पूर्वेकडून प्रभादेवी, वरळी, कोस्टल रोड व सि-लिंकच्या दिशेने जाणारे वाहनचालक हे चिंचपोकळी पुलाचा वापर करतील. कॉम्रेड कृष्णा देसाई चौककडून (भारत माता जंक्शन) शिंगटे मास्तर चौककडे वाहतूक एक दिशा मार्ग : सकाळी ७ ते दुपारी ३, शिंगटे मास्तर चौककडून कॉम्रेड कृष्णा देसाई चौकाकडे (भारत माता जंक्शन) वाहतूक एक दिशा मार्ग : दुपारी ३ ते रात्री ११, दादर पश्चिमेकडून दादर पूर्वकडे जाणारे वाहनचालक हे टिळक पुलाचा वापर करतील, प्रभादेवी व लोअर परळ पश्चिमेकडून परळला, टाटा रुग्णालय व के. ई. एम. रुग्णालय येथे जाणारे वाहनचालक हे करी रोड पुलाचा वापर करतील. (दुपारी ३ वा. ते रात्रौ ११ वा. पर्यंत), कोस्टल रोड व सी-लिंकने व प्रभादेवी, वरळीकडून परळ, भायखळा पूर्वेकडे जाणारे वाहनचालक हे चिंचपोकळी पुलाचा वापर करतील. वडाचा नाका ते फितवाला जंक्शनपर्यंत दुहेरी मार्ग चालू राहील