इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेच्या कठीण प्रश्नपत्रिकांवर पालक-शिक्षकांचा आक्षेप
सिंधुदुर्ग
इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षा दिनांक 22 फेब्रुवारी 2026 रोजी राज्यभरात घेण्यात आली. मात्र या परीक्षेतील प्रश्नपत्रिकांच्या कठीण पातळीबाबत विद्यार्थी, पालक आणि शिक्षक वर्गात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. शिष्यवृत्ती परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या बौद्धिक गुणवत्ता, संकल्पनात्मक आकलन आणि तार्किक विचारशक्तीचे मूल्यमापन करणारी महत्त्वाची प्रक्रिया मानली जाते. ग्रामीण तसेच सामाजिकदृष्ट्या वंचित घटकांतील विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा आर्थिक सहाय्याबरोबरच शैक्षणिक प्रेरणास्थान ठरते. त्यामुळे परीक्षेची रचना विद्यार्थ्यांच्या वयोगट, मानसिक विकास आणि अभ्यासक्रमाशी सुसंगत असणे अपेक्षित आहे. मात्र यंदाच्या प्रश्नपत्रिका पाहता त्या इयत्ता पाचवीच्या 11 ते 13 वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी नसून स्पर्धा परीक्षांच्या धर्तीवर असल्याचा आरोप पालक आणि शिक्षकांनी केला आहे. काहींनी तर प्रश्नपत्रिकांची तुलना थेट एमपीएससीच्या पातळीशी केली आहे. पेपर 1 आणि पेपर 2 मधील अनेक प्रश्न अत्यंत क्लिष्ट व उच्च दर्जाचे असल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे. प्रश्नपत्रिका तयार करताना विद्यार्थ्यांच्या वयाचा व मानसिक क्षमतेचा पुरेसा विचार झालेला दिसत नसल्याची टीका होत आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्या निकषांनुसार प्रश्नपत्रिका 30 टक्के सोपी, 40 टक्के मध्यम आणि 30 टक्के कठीण स्वरूपाची असणे अपेक्षित आहे. मात्र यंदाच्या परीक्षेत 70 टक्क्यांहून अधिक प्रश्न कठीण श्रेणीतील असल्याचा आरोप पालक-शिक्षकांनी केला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. स्पर्धा आवश्यक असली तरी ती विद्यार्थ्यांच्या वयानुरूप व बौद्धिक क्षमतेला सुसंगत असावी, असे मत व्यक्त होत आहे. गुणवत्तेचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन करण्याऐवजी परीक्षा विद्यार्थ्यांमध्ये मानसिक ताण आणि अस्वस्थ स्पर्धा निर्माण करत असल्याची खंतही पालकांनी व्यक्त केली.
या पार्श्वभूमीवर राज्य सरकार आणि परीक्षा परिषद यांनी प्रश्नपत्रिकांच्या स्वरूपाचा गांभीर्याने पुनर्विचार करावा, अशी मागणी पालक आणि शिक्षक वर्गाकडून करण्यात येत आहे

konkansamwad 
