कुडाळ येथील आठवडा बाजारात मिळणार स्पर्धा परीक्षेचे पेपर.....ठाकरे सेनेचे अनोखे आंदोलन
कुडाळ
देशात आणि राज्यात सातत्याने होणाऱ्या पेपरफुटीमुळे विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात ढकलले गेल्याचा आरोप करत युवासेना सिंधुदुर्गच्या वतीने कुडाळमध्ये एक अनोखे आंदोलन छेडण्यात येणार आहे. परीक्षा यंत्रणेतील ढिसाळपणा आणि भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणण्यासाठी बुधवार, १ जुलैला सकाळी ११ वाजता कुडाळच्या आठवडे बाजारात एस. टी. स्थानकाजवळ थेट उपरोधात्मक 'पेपर विक्री केंद्र' उघडले जाणार आहे.युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट यांच्या नेतृत्वात होणाऱ्या या आंदोलनात हुबेहूब बाजारातील भाजी किंवा कपड्यांच्या स्टॉलप्रमाणे 'भ्रष्ट परीक्षा महामंडळ अधिकृत पेपर विक्री केंद्र' उभारले जाईल. या स्टॉलवरून फेरीवाल्यांच्या स्टाईलमध्ये लाऊडस्पीकरद्वारे उपरोधात्मक घोषणाबाजी करत NEET, MPSC आणि इतर परीक्षांच्या डमी प्रश्नपत्रिकांची 'विक्री' केली जाईल. "अभ्यास करण्याची गरज नाही, पैसे आणा आणि थेट अधिकारी व्हा!" असा सणसणीत टोला लगावत सरकारचा तीव्र निषेध केला जाणार आहे.या आंदोलनाद्वारे सर्व पेपरफुटी प्रकरणांची उच्चस्तरीय न्यायालयीन चौकशी व्हावी आणि दोषींवर 'मोक्का' अंतर्गत कठोर कारवाई करावी, अशी मागणी युवासेनेने केली आहे. प्रामाणिक विद्यार्थ्यांना न्याय मिळेपर्यंत हा संघर्ष थांबणार नाही, असा इशारा मंदार शिरसाट यांनी दिला असून या आंदोलनात शिवसेना व युवासेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विद्यार्थी आणि पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
konkansamwad 
