कुडाळमध्ये आज रंगणार 'माझा लोकराजा महोत्सव २०२६'

कुडाळमध्ये आज रंगणार 'माझा लोकराजा महोत्सव २०२६'

कुडाळ

 

     कुडाळ तालुका दशावतार बहुउद्देशीय कलाकार संघटनेच्यावतीने आज श्री देव कुडाळेश्वर मंदिर येथे "माझा लोकराजा महोत्सव २०२६" मोठ्या उत्साहात रंगणार आहे. या महोत्सवाचे औचित्य ज्येष्ठ दशावतारी कलाकार सुधीर कलिंगण यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ ठेवण्यात आले आहे.  दशावतार कलेत अभिनय कौशल्य आणि अभ्यासपूर्ण शैलीने सुधीर कलिंगण यांनी अनेक भूमिका अजरामर केल्या. त्यांनी आपल्या सादरीकरणाने रसिकांच्या मनात वेगळी ओळख निर्माण केली. त्यांच्याच नावाने कुडाळ तालुका दशावतार संघटनेमार्फत दरवर्षी हा महोत्सव आयोजित केला जातो.महोत्सवाची सुरुवात सकाळी ९ वाजता स्पर्धात्मक सादरीकरणाच्या उद्घाटनाने होणार आहे. त्यानंतर १० ते १ वाजेपर्यंत तिसरी ते नववी मधील बालकलाकारांचा बाल दशावतार स्पर्धा सादर होणार आहे.दुपारी ३.३० वाजता कुडाळ पंचायत समितीचे सभापती मिलिंद नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत महोत्सवाचे उद्घाटन आणि मान्यवरांचा सत्कार होईल. सायंकाळी ४ वाजता कुडाळ तालुक्यातील ज्येष्ठ दशावतारी कलाकारांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे.सायंकाळी ६ वाजता सिंधुदुर्गातील ज्येष्ठ आणि अनुभवी दशावतार कलाकारांच्या संचात संयुक्त दशावतार मंडळाचे "रामभक्त जांबुवंत" हे नाटक सादर होणार आहे. या नाटकात गणपती - प्रथमेश मेस्त्री, जांबुवंत - दाजी सावंत, जांबुवंती - संतोष सामंत, बलराम - दादा राणे कोनसकर, कृष्ण - उदय राणे कोनसकर, नारद - पंढरीनाथ घाटकर, सत्राजित - आनंद नार्वेकर, रेवती - ओमप्रकाश चव्हाण, सत्यभामा - अक्षत देसाई, प्रसेन - संजय वालावलकर, सूर्यदेव - राधाकृष्ण बाबली नाईक आणि वाघ - दिनेश मुंज हे कलाकार भूमिका साकारणार आहेत.या महोत्सवाला दशावतारी कलाकार तसेच दशावतार कलाप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन तालुका दशावतार कलाकार बहुउद्देशीय संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.