दळवी महाविद्यालयाचा स्थापना दिन उत्साहात संपन्न
तळेरे
विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी महाविद्यालयाचा विजिगीषू स्थापना दिन ९ ते १४ जुलै या कालावधीत विविध शैक्षणिक, सांस्कृतिक व व्यक्तिमत्त्व विकास उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला.विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारे विविध कार्यक्रम या स्थापना दिनानिमित्त आयोजित करण्यात आले.या उपक्रमांत महिला सक्षमीकरणावरील व्याख्यान, विद्यार्थ्यांची आयक्यू चाचणी, वक्तृत्व स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, मेहंदी स्पर्धा, पोस्टर मेकिंग स्पर्धा आदी स्पर्धांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विविध रंगतदार सांस्कृतिक कार्यक्रमांनी वातावरण उत्साहपूर्ण झाले.१४ जुलै रोजी महाविद्यालयाच्या सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण समारंभ पार पडला. प्रमुख पाहुणे म्हणून कोकण संस्था अध्यक्ष श्री. दयानंद कुबल, जिल्हा परिषद सदस्या प्राची इस्वलकर, तळेरेचे तलाठी सचिन काळेबेरे, वरिष्ठ प्राध्यापक डॉ. हेमंत महाडिक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य श्रीपाद वेलींग होते.महाविद्यालयाच्या स्थापनेत मोलाचे योगदान देणारे मानद मार्गदर्शक श्री. विनायक दळवी यांच्या कार्याचा यावेळी उल्लेख करण्यात आला. यावेळी शिक्षकवृंद, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.प्रमुख पाहुणे श्री. दयानंद कुबल यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून मार्गदर्शन करताना शिक्षणाबरोबरच कौशल्य, आत्मविश्वास, शिस्त आणि सामाजिक जाणीव यांचे महत्त्व अधोरेखित केले. स्पर्धांमध्ये सहभागातून नेतृत्वगुण, संवादकौशल्य आणि व्यक्तिमत्त्व विकास साधता येतो, असे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना मोठी स्वप्ने पाहण्याचा व सातत्याने प्रयत्न करण्याचा प्रेरणादायी संदेश दिला. तसेच महाविद्यालयाच्या यशस्वी वाटचालीबद्दल सर्वांचे अभिनंदन केले.कार्यक्रमाची सांगता केक कटिंग व विद्यार्थ्यांच्या आकर्षक स्टेज सादरीकरणाने झाली. सूत्रसंचालन प्रा. नरेश शेटये यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. हेमंत महाडिक यांनी मानले.
konkansamwad 
