महिलेची सोन्याची साखळी पळवणारे दोघे कोल्हापुरातून ताब्यात

महिलेची सोन्याची साखळी पळवणारे दोघे कोल्हापुरातून ताब्यात

सावंतवाडी

 

    सावंतवाडी येथील सालईवाडा भागात भररस्त्यात पादचारी महिलेच्या गळ्यातील सोन्याचा दागिना खेचून पसार झालेल्या दोन सराईत चोरट्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. वैभव नारायणराव अडोळे (वय २६, मूळ रा. एरला, ता. मोर्शी, जि. अमरावती, सध्या रा. हिंजवडी, पुणे) आणि करण गोरखनाथ जगधने (वय १९, मूळ रा. पिंपळवाडी पिराची, ता. पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर, सध्या रा. विधाते वस्ती, औंध गावठाण, पुणे) अशी या आरोपींची नावे आहेत. कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने त्यांना आधी दुसऱ्या एका गुन्ह्यात अटक केली होती, ज्यानंतर त्यांनी सावंतवाडीत केलेल्या चोरीची कबुली दिली. सावंतवाडी पोलिसांनी या आरोपींना कोल्हापूर जेलमधून ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तसेच चोरीला गेलेला सोन्याचा दागिना पोलिसांनी आरोपींकडून हस्तगत केला आहे.  रंजना ठाकूर या सालईवाडा येथील आपल्या बिल्डिंगखाली रस्त्यावरून चालत असताना या दोन्ही तरुणांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याचा दागिना जबरदस्तीने खेचला आणि तिथून पळ काढला. या घटनेनंतर काही दिवसांतच कोल्हापूर परिसरातही अशाच प्रकारचा चेन स्नॅचिंगचा गुन्हा घडला होता. कोल्हापूर पोलिसांनी जेव्हा या संशयितांना पकडून त्यांची चौकशी केली, तेव्हा त्यांनी सावंतवाडीतही अशीच चोरी केल्याची कबुली दिली. याची माहिती मिळताच सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्या सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक प्रमोद पाटील आणि त्यांच्या पथकाने कोल्हापूर कारागृहात जाऊन दोन्ही आरोपींचा ताबा घेतला. या गुन्ह्यातील आरोपींची ओळख परेड करायची असल्याने त्यांना चेहऱ्यावर मास्क लावून पोलीस बंदोबस्तात सावंतवाडी न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी दिली असून, सावंतवाडी पोलीस या प्रकरणी पुढील अधिक तपास करत आहेत.