बोडदे-उसप येथील गौण खनिज प्रकल्पास स्थगिती द्या.....दोडामार्गमधील ग्रामस्थांची मुख्यमंत्री फडणवीसांकडे कळकळीची मागणी

बोडदे-उसप येथील गौण खनिज प्रकल्पास स्थगिती द्या.....दोडामार्गमधील ग्रामस्थांची मुख्यमंत्री फडणवीसांकडे कळकळीची मागणी

दोडामार्ग


     सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील बोडदे आणि उसप गावातील प्रस्तावित गौण खनिज उत्खनन प्रकल्पाला तातडीने स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. मंडळ अधिकारी, भेडशी यांच्या 13/7/2026 च्या पत्राचा संदर्भ देत ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मौजे बोडदे येथील सर्वे नं. 187/9 आणि मौजे उसप येथील सर्वे नं. 360 व 172 या ठिकाणी एम. एन. नायक सन्स हॉटमिक्सिंग प्रा. लि., पणजी-गोवा या कंपनीद्वारे दगडखाण, क्रशर आणि गौणखनिज उत्खन प्रकल्प प्रस्तावित आहे.हा प्रकल्प पर्यावरणाला घातक असून त्यामुळे गावातील शेतजमीन नापीक होईल, भूस्खलन होण्याचा धोका आहे. तसेच हवा प्रदूषण, जलस्रोतांवर परिणाम, वन्यजीवांचे स्थलांतर, ध्वनी व धूळ प्रदूषण वाढेल, असा दावा ग्रामस्थांनी केला आहे.दोडामार्ग तालुका इकोसेन्सिटिव्ह झोन म्हणून जाहीर असताना परराज्यातील कंपनीला महसूल विभागाने परवानगी दिल्याने ग्रामस्थांमध्ये संताप आहे. वनसंवर्धन, जैविविधता आणि पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या या भागात असे प्रकल्प राबवल्यास दोडामार्गच्या नैसर्गिक संपत्तीचा नाश होईल, असे निवेदनात नमूद आहे.याच तालुक्यातील कळणे गावाचा मायनिंगमुळे पूर्णपणे विनाश झाला आहे. असे असतानाही स्थानिकांना विश्वासात न घेता या प्रकल्पाला परवानगी दिल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.या विनाशकारी प्रकल्पामुळे पर्यावरणासोबतच शेती, पाणी आणि गावातील जीवनमानावर गंभीर परिणाम होणार असल्याने प्रकल्पाला तातडीने स्थगिती द्यावी, अशी कळकळीची विनंती ग्रामस्थांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे.