कुडाळ आरटीओतील मनमानी कारभारावर राष्ट्रवादीचा घणाघात....'वाहनचालकांची आर्थिक लूट सुरू' - तालुकाध्यक्ष संदिप पेडणेकर
वेंगुर्ला
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ परिवहन कार्यालयातील अधिकाऱ्यांकडून वाहनचालकांची आर्थिक लूट आणि अपमानास्पद वागणूक दिली जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वेंगुर्ला तालुकाध्यक्ष संदिप पेडणेकर यांनी केला आहे. याबत त्यांनी महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे आमदार अनिकेत तटकरे यांना 15 जुलै 2026 रोजी लेखी निवेदन दिले आहे.दिलेल्या तक्रारीनुसार बांदा RTO येथे वाहन चालकाला IMV अधिकाऱ्यांनी ऑनलाईन UPI दंड आकारला.यावेळी वाहनचालकाशी हुज्जत घालण्यात आली तसेच अत्यंत अपमानास्पद पद्धतीने वागणूक देण्यात आली. सर्वात गंभीर बाब म्हणजे अधिकृत पावतीवर वाहन वर्ग Vehicle Class आणि स्थान Location या रकान्यांमध्ये "Nil" असे नमूद करण्यात आले आहे. कोणतीही चूक स्पष्ट न करता सर्रास दंड वसूल केला जात आहे, असे पेडणेकर यांनी तक्रारीत नमूद केले आहे."कोणतेही कारण न देता सर्वसामान्य वाहनचालकांच्या खिशाला कात्री लावणाऱ्या या मनमानी कारभाराची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी," अशी मागणी पेडणेकर यांनी आमदार तटकरे यांच्याकडे केली आहे.या प्रकारामुळे कुडाळ RTO च्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून सर्वसामान्य नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे. या तक्रारीनंतर प्रशासन काय भूमिका घेते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
konkansamwad 
