सोनुर्ली विद्यालयात आधुनिक अध्यापनासाठी केम अमेझ कार्यशाळा

सोनुर्ली विद्यालयात आधुनिक अध्यापनासाठी केम अमेझ कार्यशाळा

 

सोनुर्ली

 

      पुणे नॉलेज क्लस्टर, सिंधुदुर्ग जिल्हा विज्ञान मंडळ आणि शिक्षण विभाग सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने माऊली माध्यमिक विद्यालय सोनुर्ली या विद्यालयात गेमिफिकेशनच्या माध्यमातून विज्ञान शिक्षण अधिक प्रभावी,आकर्षक आणि आनंददायी बनविण्यासाठी "केम अमेझ" हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला असून यातून डिजिटल आणि प्रत्यक्ष (Hands-on) अनुभवातून विद्यार्थ्यांना रसायनशास्त्रातील अधिक संवादात्मक, रंजक आणि संकल्पनाधारित क्लुप्त्या देण्यात आल्या. सहभागी शिक्षक आणि विद्यार्थ्यांना आधुनिक अध्ययन-अध्यापन पद्धती,डिजिटल गेम-आधारित शैक्षणिक साधने,खेळ आणि प्रयोगशाळेत घेता येणाऱ्या उपक्रमांचे प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले गेले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० (NEP 2020) शी सुसंगत असलेली ही साधने विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविणे, संकल्पनांचे सखोल आकलन घडविणे आणि विज्ञान शिकण्याची प्रक्रिया अधिक आनंददायी व परिणामकारक होण्यासाठी उपयुक्त ठरत आहेत.
       सोनुर्ली विद्यालयाचे उपक्रमशील शिक्षक तथा सिंधुदुर्ग जिल्हा विज्ञान मंडळाचे अध्यक्ष पांडुरंग काकतकर यांच्या संकल्पनेतून आजतागायत जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्रात अनेक उल्लेखनीय  विज्ञान विषयक उपक्रम यशस्वीपणे राबविले गेले असून त्यात सायन्स ऑन व्हील,व्हर्च्युअल रियालिटी,विज्ञान जत्रा,अपूर्व विज्ञान मेळावा, विज्ञान नाट्य महोत्सव विज्ञान प्रदर्शन, स्टेम चॅलेंज याचा समावेश आहे.ग्रामीण भागात विज्ञानाचा प्रचार प्रसार होण्यासाठी विद्यालयाचे शिक्षक काकतकर यांच्या धडपडीची दखल शिक्षण विभागाने वेळोवेळी घेतली असून  त्यांची विविध उपक्रमांसाठी राज्य व राष्ट्रीय पातळीवर अनेकदा निवड झालेली आहे.शैक्षणिक क्षेत्रातील त्यांच्या या उल्लेखनीय  कार्याबद्दल राज्य शासनाने त्यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविले आहे.
       प्रशासकीय कामकाजात AI (कृत्रिम बुद्धिमत्ता)  वापरण्यात अग्रेसर असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आधुनिक तंत्रज्ञानानाचा वापर करुन शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी सोनुर्ली सारख्या ग्रामीण भागातील शाळेत होत असलेल्या उठावाचे जि.प.शिक्षण सभापती प्रितेश राऊळ, माध्यमिक शिक्षणाधिकारी संदेश किंजवडेकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी सविता परब यांनी कौतुक केले.कार्यशाळेला पुणे नॉलेज क्लस्टरच्या जानवी अग्रवाल, शितल नागपुरे, चिन्मय स्वामी आणि निहारिका गोगटे यांनी मार्गदर्शन केले. यशस्वी नियोजनासाठी प्रशालेचे मुख्याध्यापक अरुण तेरसे, नितीन गवंडळकर, प्रदिप सावंत तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.