करूळ येथील नुकसानग्रस्त घराची सभापती सिद्धेश रावराणेंकडून पाहणी.

करूळ येथील नुकसानग्रस्त घराची सभापती सिद्धेश रावराणेंकडून पाहणी.

 

वैभववाडी

 

   तालुक्याला बसलेल्या अवकाळी पाऊस आणि चक्रीवादळाच्या तडाख्यानंतर, सभापती सिद्धेश रावराणे यांनी तातडीने नुकसानग्रस्त भागाचा दौरा केला. करूळ जामदारवाडी येथील शंकर अनंत पांचाळ यांच्या घराचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.या पार्श्वभूमीवर सभापतींनी प्रत्यक्ष भेट देऊन कुटुंबाला धीर दिला. प्रशासनाकडून या कुटुंबाला सर्वतोपरी मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. या चक्रीवादळामुळे निमअरुळे येथील वीज रोहित्र आणि जवळील सहा वीज खांब जमीनदोस्त झाले आहेत. यामुळे कुर्ली, सडुरे, शिराळे, अरुळे आणि निमअरुळे या पाच गावांचा वीजपुरवठा पूर्णपणे खंडित झाला आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सभापतींनी संबंधित वीज वितरण यंत्रणेच्या अधिकाऱ्यांना सूचना देऊन, या पाचही गावांमधील वीजपुरवठा तातडीने पूर्ववत करण्याचे आदेश दिले आहेत. करूळ येथील पांचाळ यांच्या घरावरील पत्रे उडाल्याने घराचे नुकसान झालेच, पण पाण्याची टाकी फुटून त्यामध्ये बुडून १५ कोंबड्यांचाही मृत्यू झाला आहे. या पाहणी दौऱ्यावेळी उपसभापती साची कोलते, गटविकास अधिकारी प्रिमेश वाघ, सरपंच नरेंद्र कोलते आणि इतर स्थानिक लोकप्रतिनिधी व अधिकारी उपस्थित होते. अवकाळी पावसामुळे निर्माण झालेल्या या परिस्थितीवर शासन आणि प्रशासन लक्ष ठेवून असून, बाधित नागरिकांना लवकरच दिलासा दिला जाईल, असे सभापतींनी नमूद केले.