महामार्गावर वाहने सोडून जाऊ नका......पोलीस उपनिरीक्षक जयराम पाटील यांचे वाहनचालकांना आवाहन
वेंगुर्ला
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 मुंबई-गोवा महामार्गासह इतर महामार्गांवर अपघात टाळण्यासाठी महामार्ग पोलिसांनी वाहनचालकांना विशेष आवाहन केले आहे.महामार्गावर हॉटेल, ढाबे अशा ठिकाणी अनेक चालक आपली वाहने बराच वेळ रस्त्यावरच थांबवून सोडून जातात. त्यामुळे पाठीमागून येणाऱ्या वाहनांना धडक बसून गंभीर अपघात होतात आणि निष्पाप बळी जातात, असे पोलीस उपनिरीक्षक जयराम पाटील यांनी सांगितले.कुटुंबातील कमावती व्यक्ती अपघात गेल्यास संपूर्ण कुटुंबावर आयुष्यभराचे दुःख येते. लहान मुलांना लहानपणीच वडिलांचा विरह सहन करावा लागतो. ही बाब अत्यंत दुःखदायक आहे, असेही त्यांनी नमूद केले.सर्व वाहन चालकांना विनंती आहे की महामार्गावर वाहने थांबवून सोडून जाऊ नये. वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करूनच वाहने चालवावीत. त्यामुळे होणाऱ्या अपघातांची आणि मृत्यूंची संख्या निश्चितपणे कमी होईल.तसेच महामार्गावर वाहने बेदरकारपणे सोडून जाणाऱ्या वाहनचालक/मालकांवर आणि मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांवर कठोर न्यायालयीन कार्यवाही करण्यात येईल, असा इशारा पोलीस उपनिरीक्षक जयराम पाटील यांनी दिला.
konkansamwad 
