वेंगुर्ल्यात करिअर कट्टा संसद शपथविधी सोहळा उत्साहात....'रोजगार शोधणारे नको, रोजगार निर्माते व्हा' - प्रा. डॉ. गोस्वामी

वेंगुर्ल्यात करिअर कट्टा संसद शपथविधी सोहळा उत्साहात....'रोजगार शोधणारे नको, रोजगार निर्माते व्हा' - प्रा. डॉ. गोस्वामी

वेंगुर्ला 

 

      शिक्षण प्रसारक मंडळ, कोल्हापूर संचलित बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय, वेंगुर्ला येथे महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या करिअर कट्टा उपक्रमांतर्गत करिअर कट्टा संसद शपथविधी सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, करिअरविषयक जागरूकता, कौशल्य विकास, उद्योजकता आणि सामाजिक उत्तरदायित्वाची भावना विकसित करण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. डी. बी. गोस्वामी होते. यावेळी संस्था प्रतिनिधी सुरेंद्र चव्हाण, प्रा. डी. बी. राणे, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक प्रा. एस. एम. माने यांच्यासह प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.सुरुवातीला करिअर कट्टा समन्वयक प्रा. प्रियांका प्रभू यांनी उपक्रमाची माहिती दिली. त्यानंतर नव्याने निवड झालेल्या करिअर कट्टा संसद पदाधिकाऱ्यांचा शपथविधी पार पडला.  मुख्यमंत्री - मयुरेश सौदागर, नियोजन मंत्री - साध्वी मिंडे, सामान्य प्रशासन मंत्री - श्रद्धा पालव, माहिती व प्रसारण मंत्री - विभा होडावडेकर, उद्योजकता विकास मंत्री - विनय पालकर, रोजगार व स्वयंरोजगार मंत्री - चिन्मय मेस्त्री, संसदीय कामकाज मंत्री - प्रणव सकपाळ, कौशल्य विकास मंत्री - रसिका ठाकूर, महिला व बालविकास मंत्री - पूर्वा वेंगुर्लेकर, कायदे व शिस्तपालन मंत्री - सर्वेश देवजी, संसद सदस्य - सुजल गावडे.  अध्यक्षीय मार्गदर्शनात प्रा. डॉ. गोस्वामी म्हणाले, आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ शैक्षणिक गुणवत्ता पुरेशी नाही. नेतृत्वगुण, संवादकौशल्य आणि तंत्रज्ञानाचा वापर विद्यार्थ्यांनी आत्मसात करणे गरजेचे आहे. करिअर कट्टा हा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रभावी व्यासपीठ आहे.महाराष्ट्र शासनाच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना एमपीएससी, यूपीएससी, बँकिंग, रेल्वे, सीए, सीएमए, सीएस, एमबीए यांसारख्या स्पर्धा परीक्षा व व्यावसायिक अभ्यासक्रमांविषयी मार्गदर्शन मिळते. विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहून आत्मविश्वासाने यश मिळवावे. तसेच रोजगार शोधणारे न बनता रोजगार निर्माते बनण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन त्यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. विवेक चव्हाण यांनी केले तर आभार डॉ. व्ही. एम. पाटोळे यांनी मानले.