चराठा तळखांबवाडी येथे वादळी पावसामुळे दोन घरांवर सागाचे झाड कोसळले

सावंतवाडी
चराठा तळखांबवाडी येथे झालेल्या वादळी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. या वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात दोन घरांवर भलेमोठे सागाचे झाड कोसळून सुमारे दोन लाख रुपयांचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, दोन्ही घरांमधील कुटुंबे थोडक्यात बचावली.गजानन नारायण बांदेकर आणि दत्तप्रसाद नारायण बांदेकर यांची घरे एकमेकांना लागूनच आहेत. त्यांच्या घराशेजारी असलेले २५ फूट उंचीचे एक महाकाय सागाचे झाड वादळी वाऱ्यामुळे त्यांच्या घरावर कोसळले. यामुळे गजानन बांदेकर यांच्या किचन रूमसह पडवीचे वासे, रिप आणि कौलांसह छप्पर पूर्णपणे निकामी झाले आहे. तर दत्तप्रसाद बांदेकर यांच्या किचन रूम आणि वासे, रिप आणि कौलांसह छप्पर पूर्णपणे निकामी झाले आहे. या घटनेत अंदाजे दोन लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.याच वादळी पावसात सुरेश रामचंद्र परब यांचा नारळाचा माड अर्ध्यावरून तुटून चराठा ओटवणे या मुख्य रस्त्यावर कोसळला. त्यामुळे काही काळ या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. गावातील इतर ठिकाणीही झाडांच्या फांद्या कोसळल्याने किरकोळ नुकसान झाले आहे.घटनेची माहिती मिळताच, तलाठी सुप्रिया घोडके यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी नुकसानीची पाहणी करून पंचनामा केला. यामुळे बांदेकर कुटुंबांना शासकीय मदत मिळण्याची शक्यता आहे. या वादळी पावसामुळे अचानक झालेल्या नुकसानीने तळखांबवाडीतील नागरिक भयभीत झाले आहेत.