झारखंडमध्ये मुंबई-हावडा एक्स्प्रेसचा भीषण अपघात; १४ डब्बे रूळावरून घसरले; १० जण जखमी; बचावकार्य सुरू.
रांची.
झारखंडच्या टाटानगरजवळ आज मंगळवारी पहाटे भीषण रेल्वे अपघाताची घटना घडली आहे. हावडावरून मुंबईला जाणाऱ्या मुंबई-हावडा एक्स्प्रेसचे १४ डब्बे रुळावरुन घसरल्याची माहिती मिळत आहे. झारखंडमधील सरायकेला-खरसावा जिल्ह्यात आज मंगळवारी पहाटे ३.४५ वाजता ही दुर्घटना घडली आहे. या अपघातात १० जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. या रेल्वे अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी एनडीआरएफचं पथक पोहोचलं असून बचावकार्य सुरू झालं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राजखरस्वान वेस्ट आऊटर आणि बारांबूदरम्यान एक मालगाडी रुळावरून घसरली होती. या मालगाडीच्या वॅगनन्स अजूनही रुळावरच होत्या. याचदरम्यान दुसऱ्या रुळावरून हावडावरून मुंबईला जाणारी हावडा -मुंबई मेल येत होती. त्या वॅगन्सला धडकल्यानंतर हावडा -मुंबई मेलचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये अद्याप तरी कुठल्याही जीवितहानीचं वृत्त नाही. प्रत्यक्षदर्शीनी या अपघाताबाबत सांगितलं की, रात्री काही प्रवासी रेल्वेस्थानकावर झोपले होते. ३.४५ च्या सुमारास मोठा आवाज आला.
आम्ही आवाजाच्या दिशेने पाहिलं तर रेल्वे हलताना दिसली. रेल्वे एका बाजूला झुकली होती, काही प्रवासी पडतायत असं वाटत होतं. रेल्वेचे काही डबे रुळावरून घसरल्याचं निदर्शनास आलं. दरम्यान, रेल्वे प्रशासनाने म्हटलं आहे की सर्व जखमी प्रवाशांना घटनास्थळी प्रथमोपचार देण्यात आले आहेत. हा अपघात कशामुळे झाला? यामध्ये कोणाची चूक होती? या गोष्टींचा तपास केला जात आहे. ही बातमी प्रसिद्ध करत असताना बचाव पथक घटनास्थळी दाखल झालं होतं.