आंतरराष्ट्रीय योग दिन : निरोगी जीवनशैलीकडे नेणारा जागतिक मार्ग

आंतरराष्ट्रीय योग दिन : निरोगी जीवनशैलीकडे नेणारा जागतिक मार्ग

 

     आजच्या धकाधकीच्या, स्पर्धात्मक आणि तणावपूर्ण जीवनशैलीमध्ये शारीरिक तसेच मानसिक आरोग्य टिकवून ठेवणे हे मोठे आव्हान बनले आहे.वाढत्या ताणतणावामुळे, बदलत्या जीवनपद्धतीमुळे आणि तंत्रज्ञानाच्या अतिरेकी वापरामुळे अनेक आरोग्यविषयक समस्या निर्माण होत आहेत.अशा परिस्थितीत शरीर, मन आणि आत्मा यांच्यात समतोल साधणारी योगविद्या मानवजातीसाठी एक प्रभावी जीवनपद्धती म्हणून पुन्हा एकदा केंद्रस्थानी आली आहे. भारतीय संस्कृतीची ही अमूल्य देणगी आज संपूर्ण जगाने स्वीकारली असून दरवर्षी २१ जून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून साजरा केला जातो. योग हा केवळ व्यायामाचा प्रकार नसून तो एक संपूर्ण जीवनदर्शन आहे. आरोग्य, शिस्त, आत्मनियंत्रण आणि मानसिक शांततेचा मार्ग योगातून प्राप्त होतो.आंतरराष्ट्रीय योग दिनाची संकल्पना भारताने जगासमोर मांडली. सन २०१४ मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत भारताने योग दिन साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला आणि या प्रस्तावाला जगभरातील अनेक देशांनी पाठिंबा दिला. त्यानंतर ११ डिसेंबर २०१४ रोजी संयुक्त राष्ट्रांनी २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून घोषित केला. २१ जून हा वर्षातील सर्वात मोठा दिवस मानला जातो आणि त्याला विशेष आध्यात्मिक व वैज्ञानिक महत्त्व आहे. २०१५ पासून जगभरात योग दिन उत्साहात साजरा केला जात असून आज तो एक जागतिक जनआंदोलन बनला आहे. विविध देशांमध्ये लाखो लोक एकत्र येऊन योगाभ्यास करतात आणि निरोगी जीवनाचा संदेश देतात.योगाचा उगम भारतातील प्राचीन ऋषी-मुनींच्या चिंतनातून झाला आहे. हजारो वर्षांपूर्वी महर्षी पतंजली यांनी योगसूत्रांच्या माध्यमातून योगशास्त्राला शास्त्रीय स्वरूप दिले. योगामध्ये यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी या अष्टांगांचा समावेश होतो. या प्रक्रियेमुळे व्यक्तीचे शारीरिक आरोग्य सुधारते, मानसिक स्थैर्य वाढते आणि आत्मिक उन्नती साधता येते. योग ही केवळ शरीर वाकविण्याची कला नसून विचार, भावना आणि कृती यांचे संतुलन साधण्याची एक व्यापक जीवनपद्धती आहे. त्यामुळे योगाला आरोग्य आणि अध्यात्म यांच्यातील सेतू मानले जाते.योगाचे महत्त्व आजच्या काळात अधिक अधोरेखित झाले आहे. नियमित योगाभ्यासामुळे शरीराची लवचिकता वाढते, स्नायू मजबूत होतात आणि शरीरातील विविध अवयवांचे कार्य सुरळीत राहण्यास मदत होते. प्राणायामामुळे श्वसनसंस्थेची कार्यक्षमता वाढते, रक्ताभिसरण सुधारते आणि रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते. मधुमेह, उच्च रक्तदाब, स्थूलता, हृदयविकार यांसारख्या जीवनशैलीजन्य आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी योग उपयुक्त ठरतो. त्याचबरोबर मानसिक तणाव, चिंता, नैराश्य आणि अस्थिरता कमी करण्यासाठीही योग अत्यंत प्रभावी मानला जातो. ध्यान आणि प्राणायामामुळे मन शांत राहते, एकाग्रता वाढते आणि सकारात्मक विचारांना चालना मिळते.कोरोना महामारीच्या काळात योगाचे महत्त्व अधिक प्रकर्षाने समोर आले. लॉकडाऊन, भीती आणि अनिश्चिततेच्या वातावरणात लाखो लोकांनी योग आणि ध्यानाचा आधार घेतला. शारीरिक तंदुरुस्ती राखण्याबरोबरच मानसिक संतुलन टिकवून ठेवण्यासाठी योगाने महत्त्वाची भूमिका बजावली. अनेक वैद्यकीय तज्ज्ञांनीही रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आणि मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी योगाचा अवलंब करण्याचा सल्ला दिला. त्यामुळे योगाबद्दलची जागरूकता आणि स्वीकारार्हता जगभरात अधिक वाढली.आज शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालये, सामाजिक संस्था आणि विविध संघटनांमार्फत योग दिनानिमित्त विशेष कार्यक्रम आयोजित केले जातात. सामूहिक योगाभ्यास, जनजागृती मोहीम, व्याख्याने आणि प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून योगाचे फायदे समाजापर्यंत पोहोचविले जातात. विशेषतः तरुण पिढीने योगाला जीवनाचा अविभाज्य भाग बनविण्याची गरज आहे. आधुनिक जीवनशैलीमुळे निर्माण होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक समस्यांवर योग हा एक प्रभावी, सुलभ आणि खर्चविरहित उपाय ठरू शकतो.योग दिन हा केवळ एका दिवसापुरता मर्यादित उत्सव नाही; तो निरोगी आणि संतुलित जीवन जगण्याची प्रेरणा देणारा दिवस आहे. योगाच्या माध्यमातून व्यक्ती स्वतःचे आरोग्य सुधारू शकते, मानसिक शांतता मिळवू शकते आणि समाजात सकारात्मकतेचा प्रसार करू शकते. भारतीय संस्कृतीचा हा अमूल्य वारसा आज संपूर्ण जगाला आरोग्य, शांतता आणि मानवकल्याणाचा संदेश देत आहे. त्यामुळे ‘योग करा, निरोगी राहा’ हा संदेश प्रत्येकाने आचरणात आणणे ही काळाची गरज आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने योगाचा स्वीकार करून निरोगी, आनंदी आणि सशक्त समाजनिर्मितीसाठी योगदान देणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.