निसर्गोपचारातून शरीराची संपत्ती सांभाळा : स्वागत तोडकर. मालवण येथे घरगुती उपचाराचे मोफत मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न.
मालवण.
मानवी जन्म हा जीवनाचा आनंद घेण्यासाठी झाला आहे. मात्र मानव नेहमी ताण तणाव घेऊनच जगत राहतो. यातूनच आजरांची निर्मिती होत राहते. विविध आजारांवर पूर्वजानी व ऋषी मुनींनी आयुर्वेद व निसर्गोपचाराचे महत्व सांगून ठेवले आहे. ते समजून घेणे गरजेचे आहे. आजारांचा विचार न करता नियमित निसर्गोपचाराच्या साहाय्याने हसत खेळत आयुष्य जगणे महत्वाचे आहे, निसर्गोपचारातून शरीराची संपत्ती सांभाळा, असे प्रतिपादन प्रसिद्ध निसर्गोपचार स्वागत तोडकर यांनी येथे बोलताना केले.
अनेक छोट्या छोट्या आजारांसाठी लोकांना डॉक्टरकडे धाव घ्यावी लागते. मात्र याच आजारांवर औषधी वनस्पतीच्या आधारे घरगुती उपाय करता येतात. याच दृष्टीने मनसेतर्फे माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या संकल्पनेतून आरोग्य धनसंपदा या हसत खेळत घरगुती उपचाराचे मोफत मार्गदर्शन कार्यक्रम मालवण येथील मामा वरेरकर नाट्यगृहात संपन्न झाला.
यावेळी तोडकर संजीवनी निसर्गोपचार केंद्राचे राष्ट्रीय पुरस्कार विजेते निसर्गोपचार तज्ज्ञ व व्याख्याते स्वागत तोडकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी परशुराम उपरकर यांच्याहस्ते स्वागत तोडकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मनसेचे विनोद सांडव, अमित इब्रामपूरकर, प्रीतम गावडे, विल्सन गिरकर, संदीप लाड, भारती वाघ, प्रतीक कुबल, प्राजक्ता पार्टे आदी व इतर उपस्थित होते.
यावेळी स्वागत तोडकर म्हणाले, शरीर ही आपली संपत्ती आहे, ती सांभाळणे गरजेचे आहे, त्यासाठी शरीराला छळणे टाळा. डोक्यात आजाराचा विचार करत राहिलात तर आजार होत राहतील. आपल्याला काय होईल याचा विचार करणे बंद करा. लक्षणे असल्याशिवाय कोणताही आजार मान्य करू नका. सर्व काही खाऊन पिऊन आणि व्यायाम करत आयुष्य जगल्यास आजार होणार नाहीत.शरीरावर औषधांचा अतिरेक करून घेण्यापेक्षा ऋषी मुनींनी जे आयुर्वेदचे ज्ञान दिले आहे ते जाणून घेऊन आचारणात आणा. प्रगती करताना संस्कृती व संस्कार विसरू नका, स्वतःच्या शरीरावर अविश्वास दाखवू नका असे स्वागत तोडकर म्हणाले. यावेळी स्वागत तोडकर यांनी विविध आजरांवर घरगुती आयुर्वेदिक उपाय व निसर्गोपचार याविषयी मार्गदर्शन केले.