उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडीत गुणवंत विद्यार्थी आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्कार

सावंतवाडी
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सावंतवाडी शिवसेनेच्यावतीने गुणवंत विद्यार्थी आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अकरावी प्रवेशातील विलंबावरून जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांनी राज्य शासनाला टार्गेट केले तसेच उद्धव ठाकरे हे पुन्हा मुख्यमंत्री होतील, असे त्यांनी विश्वास व्यक्त केला. येथील काझी शहाबुद्दीन सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांच्यासह महिला जिल्हाध्यक्षा श्रेया परब, विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ, माजी सभापती रमेश गावकर, उपजिल्हा प्रमुख चंद्रकांत कासार, तालुका प्रमुख मायकल डिसोझा, नम्रता झारापकर, सुकन्या नरसुले, श्रृतीका दळवी, शहर संघटक निशांत तोरसकर, शहरप्रमुख शैलेश गवंडळकर, समिरा खलील, अशोक धुरी, सुनील गावडे, आशिष सुभेदार, सरपंच गुणाजी गावडे, विश्राम कांबळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.यावेळी श्री. धुरी पुढे म्हणाले, महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाचे स्वप्न पाहिले असून कोरोना काळात त्यांनी राज्याची ज्या पद्धतीने काळजी घेतली, ते अभूतपूर्व असल्याचे सांगितले. पुन्हा एकदा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील आणि महाराष्ट्राला विकासात आघाडीवर नेतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. समाजातील प्रत्येक घटकाचा सन्मान उद्धव साहेबांच्या वाढदिवसानिमित्त करताना आनंद होत असल्याचे सांगून शिक्षण हे देशाचे भविष्य असल्याने विद्यार्थ्यांनी आपले नाव कमवण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले. मोफत शिक्षण मिळायला हवे असताना सध्या अकरावीचे वर्गही सुरू झालेले नाहीत, यावरून सरकार विद्यार्थ्यांसमोर कोणता आदर्श ठेवत आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.यावेळी विधानसभा प्रमुख श्री. राऊळ यांनी आपल्या भाषणात, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण घेऊन आपण काम करत असल्याचे सांगितले. जिल्हाभरात माजी मुख्यमंत्री उद्धव साहेबांचा वाढदिवस विविध कार्यक्रमांनी साजरा केला जात आहे. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातही विविध कार्यक्रम आयोजित करून दहावी, बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना कोरोना काळात केलेले काम अलौकिक होते आणि त्यांनी तळमळीने महाराष्ट्राची काळजी घेतली. धारावीसारखी वस्ती वाचवण्यासाठी त्यांनी फार मोठे प्रयत्न केले आणि जनतेला प्रेम दिले त्यामुळे ते सर्वसामान्यांचे नेते ठरले आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी उपस्थित अन्य मान्यवरांनी आपले विचार मांडले. त्याप्रसंगी दहावी बारावी तसेच विविध स्तरावर काम करणारे मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.