वटवृक्ष कोसळून दोन घरांचे नुकसान.....मालवण-चौके येथील घटना

मालवण
गेले दोन दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसाने मालवण चौके येथील वस्ती लगत असलेला महाकाय वटवृक्ष गुरुवारी सकाळी कोसळून लगतच्या दोन घरांच्या मध्ये पडल्याने दोन्ही घरांचे मोठे नुकसान झाले असून अंदाजे नुकसानीचा आकडा लाखोच्या घरात आहे. चौके थळकरवाडीच्या मध्यभागी असलेल्या या प्राचीन महाकाय वटवृक्षाला येथील जवळपास असलेले ग्रामस्थ दैवत मानून पूजा करत असत वटपौर्णिमेला वाडीतील महिला याच वटवृक्षाची मनोभावे पूजा करत. गतवर्षी वटवृक्ष जीर्ण झाल्याने सुकलेल्या फांद्या पडत असल्याने येथील ग्रामस्थांकडून तोडून घेण्यात आल्या होत्या. गेले दोन दिवस सतत पडणाऱ्या पावसाने पहाटे वटवृक्ष उन्मळून पडला. लगतच्या वंदना बाळकृष्ण गावडे व प्राची प्रशांत कुबल यांच्या दोन्ही घरांच्या मधोमध पडल्याने मोठी जीवितहानी टळली मात्र दोन्ही घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळतात चौके सरपंच पि. के चौकेकर यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी करत चौके तलाठी पोलीस पाटील यांना घटनेची कल्पना दिली. चौके तलाठी पी. जी. गुरव, चौके ग्राम अधिकारी लक्ष्मण सरमळकर यांनी घटनास्थळी येत पंचनामा केला. अंदाजे लाख रुपये नुकसान झाले असल्याने दोन्ही घरमालकांना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी अशी ग्रामस्थांकडून मागणी होत आहे.