पुण्यासह विदर्भ, मराठवाड्यात आज जोरदार पाऊस बरसण्याची शक्यता.

पुण्यासह विदर्भ, मराठवाड्यात आज जोरदार पाऊस बरसण्याची शक्यता.

पुणे.

  मध्य महाराष्ट्रात आणि विदर्भात आज जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. आज काही जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे काही जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज पुणे, सातारा, जळगाव, अहमदनगर येथे हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे येथे यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड, लातूर जिल्ह्यांना देखील यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर विदर्भातील सर्व जिल्ह्यांत आज मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामुळे विदर्भाला यलो अलर्ट देण्यात आला आहे.
   पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, आज अति तीव्र कमी दाबाचा पट्टा सौराष्ट्र व कच्छवर सक्रिय आहे. आज ३० ऑगस्टला अति तीव्र कमी दाबाचा पट्टा नैऋत्य अरबी समुद्रात प्रवेश करून कच्छ आणि लग्नाच्या सौराष्ट्र व पाकिस्तानच्या किनारपट्टी जवळ त्याचे रूपांतर चक्रीवादळात होण्याची शक्यता आहे. तर अजून एक कमी दाबाचे क्षेत्र मध्य व लगतच्या उत्तर बंगालच्या उपसागरावर आज तयार झाले आहे. वातावरणाच्या खालच्या थरातील वाऱ्याची द्रोणीका रेषा दक्षिण गुजरात ते उत्तर केरळ पर्यंत सक्रिय आहे. त्यामुळे आज कोकणात बहुतांश ठिकाणी, विदर्भात बऱ्याच ठिकाणी व मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
   कोकणात आज व उद्या तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. रायगड व रत्नागिरीला ३१ ऑगस्ट ते १ सप्टेंबरला तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर रायगडला २ सप्टेंबरला तुरळक ठिकाणी अति जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे रायगडला दोन सप्टेंबरला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात आज तूरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच उद्यापासून पुढील तीन ते चार दिवस मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे तेथे यलो अलर्ट देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रात देखील आज पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.