वेंगुर्ला नगरपरिषदेच्या वतीने ‘हर घर तिरंगा’ अभियान. जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन.
वेंगुर्ला.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव राज्यात व देशात मोठया उत्साहात व जल्लोषात साजरा करण्यात आलेला आहे. मागील दोन वर्षांपासून राज्यात ‘’हर घर तिरंगा म्हणजेच घरोघरी तिरंगा’’ हे अभियान साजरे केले जात आहे. देशामध्ये महाराष्ट्र राज्याने या अभियानाअंतर्गत लक्षवेधी कामगिरी केली आहे. केंद्र शासनाकडून प्राप्त सुचनानूसार ‘’हर घर तिरंगा म्हणजेच घरोघरी तिरंगा’’ हे अभियान सर्व राज्यात साजरे केले जाणार आहे.
महाराष्ट्रात देखील हे अभियान मोठया उत्साहात साजरे करण्यात येणार असून दिनांक १५ ऑगस्ट २०२४ रोजी स्वातंत्र्य दिनाच्या अनुंषगाने दिनांक ९ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट २०२४ या कालावधीत वेंगुर्ला नगरपरिषदेमार्फत ‘’हर घर तिरंगा म्हणजेच घरोघरी तिरंगा’’ हे अभियान साजरे करण्यात येणार आहे.
‘’हर घर तिरंगा म्हणजेच घरोघरी तिरंगा’’ अभियानाअंतर्गत प्रत्येक घरावर दिनांक १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या कालावधीत राष्ट्रध्वज फडकविणेबाबत सुचित करण्यात आलेले आहे. याअंतर्गत वेंगुर्ला नगरपरिषदेच्या नागरी सुविधा केंद्र येथे राष्ट्रध्वज उपलब्ध करुन दिले जाणार आहेत अथवा नागरीकांनी स्वतः राष्ट्रध्वज खरेदी करुन आपल्या घरावर फडकविण्यात यावेत तसेच वेंगुर्ला बाजारपेठेमधील हिरकणी शहरस्तर संघ संचलित सोनचिरैया शहर उपजीविका केंद्र, वेंगुर्ला येथे राष्ट्रध्वज उपलब्ध करुन दिले जाणार आहेत. वेंगुर्ला शहरातील सर्व नागरीकांनी आपल्या घरावर राष्टध्वज फडकवून या उपक्रमात उत्सफुर्तपणे सहभागी व्हावे असे आवाहन मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी केले आहे.
वेंगुर्ला नगरपरिषदेमार्फत या अभियानाअंतर्गत दिनांक १२ ऑगस्ट २०२४ रोजी सायंकाळी ५.३० वाजता वेंगुर्ला नगरपरिषद कार्यालय – हॉस्पीटल नाका- पॉवर हाऊस – शिरोडा नाका- जुना बस स्टॅंड – दाभोली नाका - नगरपरिषद कार्यालय या मार्गावर तिरंगा मोटारसायकल रॅली आयोजित करण्यात आलेली आहे. तरी आज होणा-या मोटारसायकल रॅली मध्ये वेंगुर्ला शहरातील बहुसंख्य देशप्रेमी नागरीकांनी सहभागी व्हावे असे आवाहन मुख्याधिकारी श्री. परितोष कंकाळ यांनी केले आहे.
दिनांक १३ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता दाभोली नाका ते बॅ. खडेंकर महाविदयालय वेंगुर्ला या मार्गावर ‘तिरंगा दौड’ आयोजित करण्यात आलेली आहे.दिनांक १४ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता वेंगुर्ला नगरपरिषद स्वामी विवेकानंद सभागृह, वेंगुर्ला या ठिकाणी देशभक्तीपर समूह गीत व नृत्य सादरीकरण या विषयांवर आधारित सांस्कृतिक कार्यक्रमाचे व सकाळी ११.३० वाजता भारतीय स्वातंत्र्य लढयात महत्वाची भूमिका बजावणा-या महानायकांची वेशभूषा या विषयावर वेशभूषा स्पर्धेचे (वयोगट इयत्ता १ ली ते ४ थी ) व (वयोगट इयत्ता ५ वी ते १० वी) आयोजन करण्यात आलेले आहे.
दिनांक १५ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ८.०० वाजता वेंगुर्ला नगरपरिषद क्रॉफर्ड माकेंट या इमारतीमध्ये मुख्याधिकारी श्री. परितोष कंकाळ यांच्या हस्ते ध्वजारोहण समारंभ सत्कार समारंभ संपन्न होणार आहे व तद्रनंतर वेंगुर्ला शहरातील स्वातंत्र्य सेनानी सन्मान सोहळा व वेंगुर्ला नगरपरिषदेचे उत्कृष्ट सफाई कर्मचारी व वेंगुर्ला नगरपरिषदेचे विविध स्पर्धेतील विजेत्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे.
वेंगुर्ला नगरपरिषद नागरी सुविधा केंद्र समोर तिरंगा कॅनव्हास तयार करण्यात येणार असून त्यावर ‘’हर घर तिरंगा म्हणजेच घरोघरी तिरंगा’’ किंवा जय हिंद ही घोषवाक्ये लिहावी तसेच आपल्या घरावरील राष्ट्रध्वजासोबत सेल्फी काढून harghartiranga.com या शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर अपलोड करावा व ‘’हर घर तिरंगा म्हणजेच घरोघरी तिरंगा’’ या उपक्रमामध्ये वेंगुर्ला शहरातील देशप्रेमी नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने उत्सफूर्तपणे सहभागी व्हावे असे आवाहन मुख्याधिकारी श्री. परितोष कंकाळ यांनी केले आहे.