आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) साक्षरतेसाठी विज्ञान मंडळाचा अभिनव उपक्रम

सिंधुदुर्गनगरी
आज आधुनिक तंत्रज्ञानात आर्टिफिशियल इंटेलिजन्सची प्रत्येक क्षेत्रात घोडदौड सुरू असून शालेय शिक्षणात या तंत्राचा वापर करणे काळाची गरज बनली आहे.हीच गरज ओळखून महाराष्ट्र राज्य विज्ञान अध्यापक महामंडळ व समता फाउंडेशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने "जनरेटिव्ह ए.आय.फॉर एज्युकेशन" म्हणजेच शिक्षणात AI वापर या विषयावर ऑनलाईन कार्यशाळा आयोजित केली आहे. 2 जुलै ते 5 जुलै 2025 या कालावधीत होणाऱ्या या प्रशिक्षणाची सुरुवात झाली आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य विज्ञान अध्यापक महामंडळाचे अध्यक्ष दिनेश पवार, शिक्षणाधिकारी (माध्य.),जिल्हा परिषद, पुणे डॉ भाऊसाहेब कारेकर, शिक्षण उपसंचालक पुणे विभाग डॉ गणपत मोरे, संस्थापक अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य विज्ञान अध्यापक महामंडळ दत्ता आरोटे, महाराष्ट्र राज्य विज्ञान अध्यापक महामंडळ सचिव रोहिदास एकाड, मार्गदर्शक सुनील वानखडे, ॲडव्हान्स कॉम्प्युटर ट्रेनर मयूर आहेर व अमोल कळंबे, उपप्राचार्य की एम.ए.एस. टी.आय.रिसोड यांच्या उपस्थितीत होणार आहे. सदर प्रशिक्षणात Chat GPT, Slidego AI, Question well, Flexi AI, Wolfram Alpha, Magic school अशा अनेक तंत्रांचा शिक्षणात उपयोग याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. हे प्रशिक्षण ऑनलाईन असून राज्यभरातील शिक्षण क्षेत्रात अमुलाग्र बदल घडवून आणणारे आहे.या प्रशिक्षणासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून विक्रमी नोंदणी झाली असून विज्ञान मंडळाच्या या अभिनव उपक्रमाचा लाभ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रातील सर्व मंडळीनी घ्यावा असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा विज्ञान मंडळाचे अध्यक्ष पांडुरंग काकतकर यांनी केले आहे. शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती असलेला हा जिल्हा ए आय साक्षरतेतही अग्रेसर व्हावा यासाठी होत असलेल्या विज्ञान मंडळाच्या या उपक्रमास सिंधुदुर्ग जिल्हा माध्य. शिक्षणाधिकारी कविता शिंपी, डाएट प्राचार्य राजेंद्र कांबळे तसेच मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष वामन तर्फे यांनी शुभेच्छा दिल्या.