बेलापूरमध्ये इमारत कोसळली; दोघांना सुखरूप बाहेर काढले; बचावकार्य सुरू.

बेलापूरमध्ये इमारत कोसळली; दोघांना सुखरूप बाहेर काढले; बचावकार्य सुरू.

नवीमुंबई.

   नवी मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सीबीडी बेलापूर परिसरात असलेल्या फसणपाडा गावात ४ मजली रहिवासी इमारत कोसळली आहे. आज शनिवारी पहाटे ५ वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. सुदैवाने इमारत कोसळण्याआधी रहिवाशांनी रस्त्यावर धाव घेतली होती. त्यामुळे मोठी जीविहानी टळली. मात्र, इमारतीत अजूनही २ ते ३ जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
   दरम्यान, इमारत कोसळल्याची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान आणि पोलिस दाखल झाले आहेत. सध्या बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. घटनेबाबत सविस्तर माहिती अशी की, सीबीडी बेलापूर परिसरातील शहाबाज गावात ४ मजली रहिवासी इमारत आहे. या इमारतीच्या तळमजल्यावर एक सलून आहे. शनिवारी पहाटे ५ वाजेच्या सुमारास सलूनचालकाला अचानक इमारतीत कंपण होत असल्याचे जाणवले. त्याने तातडीने आरडाओरड सुरू केली. त्यामुळे परिसरातील नागरिक जमा झाले. त्यांनी इमारतीतील तिन्ही मजल्यावर असलेल्या रहिवाशांना तातडीने बाहेर काढले.
    मात्र, इमारतीबाहेर पडताना २ ते ३ रहिवासी ढिगाऱ्याखाली गाडले गेले.त्यानंतर काही क्षणातच ही इमारत जमीनदोस्त झाली.ही घटना इतकी भीषण होती, की परिसरातील आसपासच्या इमारतीला हादरे बसले. या घटनेनंतर परिसरात मोठी आरडाओरड सुरू झाली. स्थानिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले.सध्या मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या २ जणांना सुखरुप बाहेर काढण्यात आलं होतं. अजूनही काहीजण अडकून पडल्याची शक्यता आहे. त्यांनाही वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहे.