देवरूखमधील पाध्ये इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये उभारणार रोबोटिक्स प्रयोगशाळा.
रत्नागिरी.
रोबोटिक्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ऍडव्हान्सड सेन्सर्स अशा आधुनिक तंत्रज्ञानाची लहानपणापासूनच ओळख व्हावी व भविष्यातील तंत्रज्ञान विकासाच्या दृष्टीने विद्यार्थ्यांची प्राथमिक तयारी व्हावी तसेच भावी काळातील उच्चतंत्रज्ञानाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात या उद्दिष्टाने देवरुखमधील श्रीमती अरुंधती अरुण पाध्ये इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये रोबोटिक्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स या विषयांची प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहे अशी माहिती देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री. सदानंद भागवत यांनी दिली.
यासाठी पुणे येथील स्काय रोबोटिक्स या संस्थेशी सामंजस्य करार करण्यात आला आहे. या प्रयोगशाळेच्या माध्यमातून इयत्ता पहिली पासून दहावीपर्यंत आधुनिक तंत्रज्ञानाचे ज्ञान विद्यार्थ्यांना देण्यात येईल. शैक्षणिक संस्थांनी देशाच्या प्रगती करता आणि विकसित भारत बनविण्याची महत्त्वाकांक्षा डोळ्यापुढे ठेवून अत्याधुनिक सुविधा ग्रामीण विद्यार्थ्यांना निर्माण करू दिल्या पाहिजेत या उद्दिष्टाने देवरुख शिक्षण प्रसारक मंडळ काम करीत आहे व याच उद्देशाने संस्थेने कोकणातील पाहिले सृजन सायन्स अँड इनोव्हेशन ऍक्टिव्हिटी सेंटर उभे केले आहे असेही श्री भागवत यांनी नमूद केले.