कोकण रेल्वे मार्गावरील वंदे भारत, तेजस एक्सप्रेस सोमवारपासून तीनच दिवस धावणार. कोकण रेल्वे मार्गावरील पावसाळी वेळापत्रकामुळे झाला बदल.
रत्नागिरी.
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस तसेच तेजस एक्सप्रेस या कोकण रेल्वे मार्गावरील दोन सुपरफास्ट एक्सप्रेस दि.10 जून 2024 पासून ऑक्टोबर अखेरपर्यंत आठवड्यातून तीनच दिवस धावणार आहे.
कोकण रेल्वे मार्गावर दरवर्षी पावसाळी वेळापत्रक लागू होते. कोकणात कोसळणारा मुसळधार पाऊस, मार्गावर दरडी कोसळण्याचा संभाव्य धोका या गोष्टींचा विचार करता कोकण रेल्वे मार्गावर दरवर्षी 10 जून ते ऑक्टोबर अखेरपर्यंत पावसाळी वेळापत्रकाची अंमलबजावणी केली जाते. यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांच्या वेगावर नियंत्रण आणले जाते. याच कारणामुळे कोकण रेल्वे मार्ग वर धावणाऱ्या मुंबई सीएसएमटी मडगाव (22229/22230) वंदे भारत एक्सप्रेस, तसेच मुंबई सीएसएमटी -मडगाव (22119/22120) या दोन गाड्या दिनांक 10 जून 2024 पासून कोकण रेल्वे मार्गावरील पावसाळी वेळापत्रक संपेपर्यंत म्हणजे 31 ऑक्टोबर 2024 पर्यंत आठवड्यातून तीनच दिवस धावणार आहेत.
इतर वेळी यातील वंदे भारत एक्सप्रेस ही आठवड्यातून सहा दिवस तर तेजस एक्सप्रेस आठवड्यातून पाच दिवस चालवण्यात येते. मात्र, कोकण रेल्वे मार्गावर दिनांक 10 जून पासून पावसाळी वेळापत्रकाची कार्यवाही केली जाणार असल्यामुळे आता या दोन्ही गाड्या सोमवारपासून आठवड्यातून तीनच दिवस कोकण रेल्वे मार्गावर धावणार आहेत.