कोल्हापुरातील काँग्रेसचे आमदार पी.एन.पाटील यांचे निधन.
कोल्हापूर.
काँग्रेसचे एकनिष्ठ नेते आणि करवीरचे आमदार पी. एन. पाटील यांचे आज गुरूवारी पहाटे निधन झाले आहे. वयाच्या ७१ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. मिळालेल्या माहितीनुसार, पाटील हे रविवारी घरात पाय घसरून पडल्याने त्यांच्या डोक्याला आणि हाताला मोठी दुखापत झाली होती. त्यांच्यावर गेल्या चार दिवसांपासून कोल्हापुरच्या एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, आज पहाटे उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.
पीएन पाटील हे रविवारी घरात पाय घसरून पडले. यामुळे त्यांच्या मेंदूला आणि हाताला मोठी दुखापत झाली.यानंतर त्यांना कोल्हापुरातील ऍस्टर आधार रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली. मात्र, शस्त्रक्रियेनंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. त्यांच्यावर गेल्या चार दिवसांपासून अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. मात्र, आज पहाटे त्यांचा मृत्यू झाला. आज सकाळी जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये पीएन पाटील यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी सडोली खालसा येथे नेण्यात येणार आहे. तेथेच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील असे समजते.
काँग्रेसचा एकनिष्ठ नेता म्हणून पांडुरंग निवृत्त्ती पाटील ऊर्फ पीएन पाटील यांची राज्यात ओळख होती. गेल्या ४० वर्षांपासून ते राजकारणात सक्रिय होते. त्यांनी करवीर विधानसभा मतदारसंघातून २००४ आणि २०१९ मध्ये निवडणूक जिंकली. कार्यकर्त्यांच्या हाकेला धावून जाणारा नेता अशी त्यांची जिल्ह्यात प्रतिमा होती. पीएन पाटील यांचा जन्म ६ जानेवारी १९५३ साली कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील सडोली खालसा गावात झाला.पीएन पाटील यांनी पहिल्यांदा २००४ मध्ये विधानसभेची निवडणूक जिंकली. मात्र, त्यानंतर २००९ आणि २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना पराभवाला सामोरे जावा लागले. यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी शिवसेनेचे तत्कालिन आमदार चंद्रदीप नरके यांचा पराभव करत दुसऱ्यांदा विधानसभा गाठली.