वानखेडेवर सुर्यकुमार यादव नावाचं वादळ; सुर्यकुमारच्या नाबाद शतकी खेळीने मुंबई इंडियन्सचा सनरायझर्स हैदराबादवर दणदणीत विजय.

वानखेडेवर सुर्यकुमार यादव नावाचं वादळ; सुर्यकुमारच्या नाबाद शतकी खेळीने मुंबई इंडियन्सचा सनरायझर्स हैदराबादवर दणदणीत विजय.

मुंबई.

  आयपीएल 2024 च्या 55 व्या सामन्यात आज मुंबई इंडियन्ससमोर सनरायझर्स हैदराबादचं आव्हान होतं. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर हा सामना खेळला गेला. मुंबई इंडियन्सनं सनरायझर्स हैदराबादवर 7 गडी राखून विजय मिळवला आहे. प्रथम फलंदाजी करताना हैदराबादनं 20 षटकांत 8 गडी गमावून 173 धावा केल्या होत्या. मुंबई इंडियन्सनं हे लक्ष्य 17.2 षटकांत 3 गडी गमावून गाठलं.
   मुंबईकडून सूर्यकुमार यादवनं शानदार शतक ठोकलं. तो अवघ्या 51 चेंडूत 102 धावा करून नाबाद राहिला. आपल्या या खेळीत त्यानं 12 चौकार आणि 6 षटकार लगावले. त्याला तिलक वर्मानं उत्तम साथ दिली. या दोघांमध्ये चौथ्या विकेटसाठी नाबाद 143 धावांची भागीदारी झाली, ज्यामुळे सामना हैदराबादच्या हातातून निसटून गेला. तिलक वर्मा 37 धावा करून नाबाद राहिला.
   मुंबई इंडियन्सची सुरुवात खराब झाली होती. रोहित शर्मा आजही अपयशी ठरला. तो 3 चेंडूत केवळ 4 धावा करून तंबूत परतला. ईशान किशन 9 धावा करून तंबूत परतला. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला नमन धीर 9 चेंडूत भोपळाही न फोडला आऊट झाला. हैदराबादकडून भुवनेश्वर, यानसन आणि कमिन्स यांनी प्रत्येकी 1-1 बळी घेतला.
   तत्पूर्वी, नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना सनरायझर्स हैदराबादनं 8 गडी गमावून 173 धावा केल्या. संघासाठी सलामीवीर ट्रॅव्हिस हेडनं 30 चेंडूत सर्वाधिक 48 धावांची खेळी खेळली. तर नितीश रेड्डीनं 20 धावा केल्या. शेवटी, कर्णधार पॅट कमिन्सनं फटकेबाजी करत 17 चेंडूत नाबाद 35 धावा केल्या. या व्यतिरिक्त इतर कोणताही फलंदाज आपली छाप सोडू शकला नाही. या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी चमकदार कामगिरी केली. कर्णधार हार्दिक पांड्या आणि फिरकीपटू पीयूष चावला यांनी सर्वाधिक 3-3 बळी घेतले. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि पदार्पण करणाऱ्या अंशुल कंबोजनं 1-1 विकेट घेतली.