नाट्य क्षेत्रातील सुप्रसिद्ध संगीत दिग्दर्शक दादा परसनाईक काळच्या पडद्याआड.

नाट्य क्षेत्रातील सुप्रसिद्ध संगीत दिग्दर्शक दादा परसनाईक काळच्या पडद्याआड.

मालवण.

   मालवणचे सुपुत्र आणि मराठी रंगभूमीवरील संगीत क्षेत्रातील दादा अशी ओळख असलेले ज्येष्ठ संगीत दिग्दर्शक शशिकांत उर्फ दादा बाळकृष्ण परसनाईक (वय ८९) यांचे आज सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास दादर गोखले रोड येथील निवासस्थानी हृदयविकाराच्या झटक्याने झोपतेच निधन झाले. दादा परसनाईक यांच्या निधनाचे वृत्त पसरताच मराठी चित्र नाट्य सृष्टीतील दिग्गज कलाकार, तंत्रज्ञ यांनी दादांच्या निवासस्थानी भेट देत त्यांच्या पार्थिवचे दर्शन घेतले. सायंकाळी दादर शिवाजी पार्क येथील स्मशान भूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
   मालवण बाजारपेठेतील रहिवासी असणारे शशिकांत उर्फ दादा बाळकृष्ण परसनाईक यांचे वडील दाजी परसनाईक हे प्रतिभावंत संगीतकार म्हणून ओळखले जायचे. नाट्य पदांना दाजी परसनाईक हे अत्यंत कुशल पद्धतीने चाली बांधणारे संगीतकार म्हणून त्या काळात प्रसिद्ध असल्याने परसनाईक यांच्या घरी नाट्यकलावंतांचा नेहमीच राबता असायचा. साहजिकच घरात असणारे नाट्य क्षेत्राचे संस्कार दादा परसनाईक यांच्यावर झाले. २८ मे १९३२ रोजी दादा परसनाईक यांचा जन्म झाला. मालवण सोमवारपेठ मधील भंडारी एज्युकेशन सोसायटी हायस्कुलमध्ये त्यांनी जुनी अकरावी (मॅट्रिक) पर्यंतचे शिक्षण घेतले. शालेय जीवनापासून दादा परसनाईक यांनी रंगभूमीची सेवा करण्यास सुरुवात केली. वडिलांबरोबर त्यांनी संगीत दिग्दर्शनातही सहभाग घेतला. मालवणच्या नाट्यचळवळीत दादा परसनाईक जसे निगडित होते तसे सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या नाट्य चळवळीतही त्यांचा विशेष सहभाग असायचा. भंडारी हायस्कुलमधून अकरावी झाल्यानंतर सुमारे दोन तीन वर्षे त्यांनी मालवण मधील खरेदी विक्री संघातही लिपिक म्हणून काम केले. मात्र, त्या नोकरीत ते फार काळ रमले नाहीत. त्यांनी १९७४ मध्ये मुंबई गाठली आणि छोटी मोठी कामे करता करता त्यांनी मुंबईतील नाट्य क्षेत्रात संगीत दिग्दर्शक म्हणू जम बसविण्यास सुरुवात केली. अल्पवाधितच दादा परसनाईक हे मराठी रंगभूमीवर ख्यातनाम संगीत दिग्दर्शक म्हणून ओळखले जाऊ लागले. मुंबईत गेल्यावरही मालवणवर त्यांचे विशेष प्रेम कायम होते. मालवण मध्ये झालेल्या मराठी नाट्य संमेलनात त्यांचा सक्रिय सहभाग होता.
दादा परसनाईक यांनी तीन मराठी चित्रपटांना संगीत दिले. त्यांनी दादर येथील आपल्या निवासस्थानी छोटेखानी स्टुडिओ उभारला होता. त्यांना सर्व वाद्ये वाजविण्याची कला अवगत होती. मराठी नाट्य क्षेत्रातील नाट्य संपदा भद्रकाली प्रोडक्शन यासह इतर संस्थांच्या अनेक नाटकांना त्यांनी संगीत दिले होते. त्यातील आई रिटायर होते, चार दिवस प्रेमाचे, वाडा चिरेबंदी, सही रे सही प्रियतमा, स्वप्नात रंगले मी, केव्हा तरी पहाटे, युगांतर, सदाचा बाप ४२० या व इतर अशा अडीज हजारहून अधिक नाटकांना त्यांनी संगीत दिले होते. २०२२ मध्ये मानवेंद्र आर्ट्सच्या आवर्त या नाटकाला त्यांनी संगीत दिले होते. अलीकडच्या काळात झी मराठी गौरव पुरस्कारासाठी त्यांचे नामांकन झाले होते. त्यांना महाराष्ट्र शासनाचा गुणगौरव पुरस्कारही २०२३ मध्ये मिळाला होता. तर कोरोनाच्या काळात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला होता.
   आज सायंकाळी मुंबईच्या यशवंतराव चव्हाण नाट्यमंदिरात त्यांचे पार्थिव दर्शनासाठी काही काळ ठेवण्यात आले होते. त्यांच्या पश्चात पत्नी सुषमा, मुलगा विद्यानंद, सून सौ विनया, मुलगी सौ. ललना, सौ. मिनता, सौ. शलाका या तीन मुली, चार नातू, दोन नाती असा परिवार आहे. दादा परसनाईक यांच्या निधनामुळे मुंबईसह मालवणात शोक व्यक्त करण्यात येत आहे.