बेकायदा दारू वाहतूक प्रकरणी बांदा येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई 17 लाखाचा मुद्देमाल जप्त
बांदा
गोवा बनावटीच्या दारुची बेकायदा वाहतूक करणाऱ्या एका बोलेरो टेम्पोवर राज्य उत्पादन शुल्कच्या इन्सुली पथकाने बांदा येथे कारवाई केली. सदरचा टेम्पो नवी मुंबई येथे जात असल्याची कबुली चालकाने दिली. या प्रकरणी बोलेरो चालक वलेरियाने सेबिस्तीयनो ब्रगंजा (रा. ऐरोली) याला ताब्यात घेण्यात आले. या कारवाईत १७ लाख १५ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. कारवाईनंतर सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी अनिल पाटील, राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक मनोज शेवरे, मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख यांनी इन्सुली तपासणी नाका येथे भेट दिली. सदर कारवाई मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास करण्यात आली.
राज्य उत्पादन शुल्कचे इन्सुली पथक बांदा परिसरात गस्त घालत होते. दरम्यान एमएच ४३ बीएक्स ११५४ क्रमांकाचा बोलेरो टेम्पो आला असता संशय आल्याने तो तपासणीसाठी थांबविण्यात आला. तपासणी केली असता त्यात महागड्या ब्रँडची दारू असल्याचे समोर आले. गोवा बनावटीच्या दारुचे ५० बॉक्स आढळून आले. सदर कारवाई इन्सुली तपासणी नाका भरारी पथकाने केली. अधिक तपास दुय्यम निरीक्षक प्रदीप रासकर करीत आहेत.